आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असून रोजगारही हिरावल्या गेला आहे. गरीब व गरजू परिवारांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाल्याने धान्यकोंडीची शक्यता बळावली होती. मात्र, केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून तीन महिने प्रतिव्यक्ती पाच किलो अतिरिक्त तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नियमित धान्यसाठाही वेळेत देण्याचे निर्देश दिल्याने जिल्ह्यातील धान्यकोंडीला ब्रेक लागला असून या योजनेचा जिल्ह्यातील १० लाख ७३ हजार १९२ लोकांना लाभ मिळणार आहे.जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये ८५० स्वस्त धान्य दुकाने असून या सर्व दुकांनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या (पिवळी शिधापत्रिका) ४५ हजार ३३ शिधापत्रिकाधारकांना २ रुपये प्रतिकिलो प्रमाणे १५ किलो गहू, ३ रुपये किलो प्रमाणे २० किलो तांदूळ तर प्राधान्य कुंटुंब योजनेच्या ८ लाख ६ हजार २९७ आणि एपिएल शेतकरी योजनेच्या १ लाख ५२ हजार (पिवळी व केसरी शिधापत्रिका) लाभार्थ्यांना २ रुपये दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, ३ रुपये किलो प्रमाणे प्रतिव्यक्ती २ किलो प्रमाणे तांदूळ नियमित वितरित केले जात आहे.लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता शासनाने प्रारंभी एप्रिल ते जून या तीन महिन्याचे धान्य एकाचवेळी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील भारतीय खाद्य निगमच्या गोदामामध्ये धान्यसाठ्याचा पुरवठा करण्यात आला. मात्र, त्यानंतर दरमहा नियमित धान्य पुरवठा करण्यासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून प्राधान्य योजना व अंत्योदय योनजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आठही तालुक्यातील १० लाख ७३ हजार १९२ लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे धान्यवाटप करण्यास सुरुवात झाली आहे. सर्व स्वस्तधान्य दुकानदारांना एप्रिल महिन्याचा धान्य पुरवठा झाला असून वाटपाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. येत्या दोन-तीन दिवसामध्ये मे महिन्याचे धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविले जाणार असून १ मे पासून धान्य वाटपाला सुरुवात होणार आहेत.नियमित ९४ तर मोफत ७६ टक्के धान्य वाटपआपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात १ लाख १६ हजार ६५६ मॅट्रिक टन धान्य साठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये ९७ हजार ५१७ मॅट्रिक टन गहू व १९ हजार १३९ मॅट्रिक टन तांदूळाचा समावेश आहे. यापैकी एप्रिल महिन्याकरिता ६ हजार ७२० मेट्रिक टन धान्यसाठा जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिला आहे.जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत आठही तालुक्यातील ८५० स्वस्तधान्य दुकानदारांना धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी सामाजिक अंतर पाळून व प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करुन लाभार्थ्यांना नियमित व मोफत धान्य पुरवठा सुरु केला आहे.जिल्ह्यात अंत्योदय कुटुंब योजनेचे ४७ हजार ४१, प्राधान्य कुटूंब योजनेचे १ लाख ९६ हजार ९४० व एपिएल शेककरी योजनेचे २२ हजार ७०० असे एकूण २ लाख ६७ हजार ४८१ शिधापत्रिकाधारक आहे. यापैकी २ लाख ५१ हजार ७३९ शिधापत्रिकाधारकांना म्हणजे ९४ टक्के लाभार्थ्यांना आतापर्यंत एप्रिल महिन्याचे नियमित धान्य मिळाले आहे. तर मोफत योजने अंतर्गत १ लाख ९४ हजार ९६७ लाभार्थ्यांना म्हणजेच ७६ टक्के धान्य वाटप पूर्ण झाला आहे.मोफत धान्य वाटपातून शेतकऱ्यांना वगळलेसार्वजनिक वितरण व्यवस्थे मार्फत जिल्ह्यातील प्राधान्य योजना, अत्योदय योजना व एपिएल शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारकांना नियमित शासकीय धान्य पुरवठा होत आहे. मात्र, कोरोनाच्या आपत्तीकाळात गरजुंना आधार म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या योजनेत प्राधान्य कुटुंब व अत्योदय कुटुंबांचा समावेश केला असून एपिएल शेतकरी कुटुंबांना वगळण्यात आले आहे. यामुळे शेतकरी कुटुंबामध्ये रोष व्यक्त होत आहे. यातील काही लाभार्थीही स्वस्त धान्य दुकानात मोफत धान्याची मागणी करीत असल्याने दुकानदारांचीही डोकेदुखी वाढली आहे.लाभार्थ्यांची ओरड, दोघांविरुद्ध कारवाईजिल्ह्यातील काही स्वस्तधान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची लूट होत असल्याच्याही तक्रारी येत आहे. काही दुकानदारांकडून धान्यात दांडी मारण्याचा प्रकार चालविल्याचीही ओरड होत आहे. अशाच दोन तक्रारी अन्न पुरवठा विभागाकडे प्राप्त होताच समुद्रपूर व सेलू येथील प्रत्येकी एका स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून होणारा धान्य पुरवठा बंद करण्यात आला असून तो दुसºयाकडे देण्यात आला आहे.जिल्ह्याकरिता मुबलक धान्यसाठा उपलब्ध झाला आहे. एप्रिल महिन्याचा ६ हजार ३७९ मॅट्रीक टन धान्यसाठा प्रत्येक तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना पुरविण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसात मे महिन्याचाही धान्यसाठा पुरविला जाईल. सर्व लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एकाचवेळी स्वस्त धान्य दुकानात गर्दी न करता सहकार्य करावे. काही तक्रारी असल्यास तालुकास्तरीय किंवा जिल्हा कार्यालयाकडे संपर्क साधावा.-रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी.
दहा लाखांवर नागरिकांच्या धान्यकोंडीला लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 5:00 AM
जिल्ह्यात अंत्योदय कुटुंब योजनेचे ४७ हजार ४१, प्राधान्य कुटूंब योजनेचे १ लाख ९६ हजार ९४० व एपिएल शेककरी योजनेचे २२ हजार ७०० असे एकूण २ लाख ६७ हजार ४८१ शिधापत्रिकाधारक आहे. यापैकी २ लाख ५१ हजार ७३९ शिधापत्रिकाधारकांना म्हणजे ९४ टक्के लाभार्थ्यांना आतापर्यंत एप्रिल महिन्याचे नियमित धान्य मिळाले आहे. तर मोफत योजने अंतर्गत १ लाख ९४ हजार ९६७ लाभार्थ्यांना म्हणजेच ७६ टक्के धान्य वाटप पूर्ण झाला आहे.
ठळक मुद्देप्रधानमंत्री गरीब कल्याण योजना : ८५० स्वस्त धान्य दुकानातून धान्यवाटप