वर्धा : धनादेश अनादर प्रकरणात सेलू निवासी आरोपी कृष्णा मारोतराव चाफले यास एक महिन्याचा कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निर्वाळा तिसरे न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी ए.टी. काळे यांनी दिला.हिंगणघाट येथील पवनकुमार भट्टड यांचे कृषी केंद्र आहे. कृष्णा चाफले याचेही सेलू येथे कृषी केंद्र आहे. तो नेहमी भट्टड यांच्या दुकानातून साहित्य उधारीत खरेदी करीत होता. उधारी चुकती करण्याच्या उद्देशाने चाफले याने ०६ जानेवारी २०१४ रोजी २७ हजार ७३६ रुपयांचा आयडीबीआय बँकेचा धनादेश दिला. सोबतच बँकेत सदर धनादेशाबाबत ‘स्टॉप पेमेंट’ चा अर्ज केला. परिणामी, भट्टड यांनी सदर धनादेश खात्यात जमा केला असता बँकेने तो धनादेश न वटविता परत केला. यानंतर भट्टड यांनी अॅड. इब्राहीम बख्श आजाद यांच्या माध्यमाने कृष्णा चाफले यास नोटीस पाठवून थकित रकमेची मागणी केली; पण ती रक्कम दिली नाही. यामुळे भट्टड यांनी वर्धा न्यायालयात प्रकरण दाखल केले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्यायाधीश ए.टी. काळे यांनी आरोपी कृष्णा चाफले यास धनादेश अनादर प्रकरणात दोषी ठरवून एक महिन्याचा कारावास व ५० हजार दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा कारावास, अशी शिक्षा सुणावली. पवन भट्टड यांच्यावतीने अॅड. इब्राहीम बख्श आजाद यांनी युक्तिवाद केला.(कार्यालय प्रतिनिधी)
धनादेश अनादरप्रकरणी एक महिन्याचा कारावास
By admin | Published: June 05, 2015 2:12 AM