हिंगणघाट (वर्धा) : महाविकास आघाडीच्या काळात कृषिपंपांच्या देयकाची पठाणी वसुली केली जायची. देयक भरल्याशिवाय विद्युत पुरवठा केला जात नव्हता. एखाद्या रोहित्रावरील अर्ध्या शेतकऱ्यांनी देयक भरल्यानंतरही विद्युत सुरू केली जात नव्हती. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन मानसिकरित्या खचला होता. तेव्हा यात्रा काढणारे नेते कुठे गेले होते? यांची सरकार आल्यावर एक आणि गेल्यावर दुसरी भूमिका ही सर्वसामान्यांची दिशाभूल करणारी आहे, असा निशाणा आमदार समीर कुणावार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन जनसंवाद यात्रेवर साधला.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये थकीत बिल असेल तरी विनाविलंब एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता विद्युत पुरवठा मिळत आहे. दीड वर्षांच्या काळात एकही कृषी विद्युत पुरवठा खंडित गेला केला नाही. तसेच शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे ठरविले असून, त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा कृषी विद्युत पुरवठा सुरू होणार, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
२०२१ मध्ये जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक पूर्णत: नष्ट झाले होते. त्या सोयाबीन पिकांचा मोबदला आणि खंडित केलेला कृषीचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून वर्ध्यात सात दिवस उपोषण करून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला सोयाबीनची नुकसानभरपाई देण्याची आणि थकीत देयक असलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. तेव्हा हे यात्रेकरू कुठे गेले होते? आता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा खटाटोप चालविला आहे, असेही आ. कुणावार म्हणाले.
माजी आमदारांनी आजनसरा बॅरेज प्रकल्पाचे काम दोन महिन्यात सुरू करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. वास्तविकत: हे काम आता सुरूच होणार असल्याने केवळ श्रेय लाटण्यासाठी विरोधकांचा डाव असल्याने मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सन २००१ मध्ये आजनसरा बॅरेल प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून २०१४ पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही काम पुढे गेले नाही. २०१९ ते २०२२ महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. राज्यात परिवर्तन होताच उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आजनसरा बॅरेजकरिता निधीची तरतूद केली. आजनसरा येथील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बॅरेज प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. तीच बाब हेरून विरोधकांनी आता राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न चालविला असल्याचेही आमदार समीर कुणावार म्हणाले.
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याऐवजी रात्रीला १२ तास वीज देत असल्याने शेतकऱ्यांचा जीव धोक्यात टाकत आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही, ही शेतकऱ्यांची थट्टा असून, सरकार शेतकरी हिताचे की विरोधी? हा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांकरिता ही परिवर्तन जनसंवाद यात्रा काढली आहे. निवडणुकींना अद्याप दीड ते दोन वर्ष वेळ आहे. त्याही लावणार की नाही, याची शाश्वती नाही.
- अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस