वर्धा : सावंगी येथील राधिकाबाई मेघे मेमोरियल कॉलेज ऑफ नर्सिंगमधील जवळपास 10 विद्यार्थिनींची “हिपॅटायटीस बी’ च्या लसीमुळे प्रकृती बिघडली आहे. यामध्ये हेमानी रविंद्र मलोडे (18) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. हेमानीची प्रकृती गंभीर असल्यानं तिच्यावर सावंगी येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच आज तिचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात वावरताना संरक्षण म्हणून ‘हिपॅटायटीस बी’ ही लस दिली जाते.
राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाला असलेल्या बीएससी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना ही लस देण्यात आली. त्यानंतर जवळपास 10 विद्यार्थिनींची प्रकृती बिघडल्याने एकच धावपळ उडाली. विद्यार्थिनीला अॅनाफायलाटिक्स रिअॅक्शन आल्यान तिची प्रकृती गंभीर आहे. असं क्वचितच होते. ही बाब दुर्दैवी आहे. याबाबत नोडल सेंटरला कळविले असून त्याचे रिपोर्ट पाठविले आहे, अस डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये मुत्यूची नोंद करण्यात आली आहे.