खुल्या न्यायालयात मुख्य न्यादंडाधिकाऱ्यांचा निर्वाळा वर्धा: रसायनाचा वापर करून केळी पिकवून विक्री करणाऱ्या येथील सिद्धु फ्रुट कंपनीचा मालक शुद्धोधन तायडे याला एक वर्षे सश्रम कारावास आणि एक वर्षे दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने-गाडेकर यांनी सोमवारी दिला. तायडेवर अन्न भेसळ प्रतिबंधित कायदा १९५४ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. हकीकत अशी की, अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत इथेपॉन या रसायनाचा केळी या अन्नपदार्थ पिकविण्याकरिता बंदी असताना येथील सिद्धु फ्रुट कंपनी, फ्रुट मार्केटचा मालक शुद्धोधन तायडे हा या पद्धतीने केळी पिकवीत असल्याचे दिसून आले. तसेच त्याच्याकडे ईथेपॉन हे प्रतिबंधित रसायनाचे द्रावणही मिळून आले होते. यावरून अन्न भेसळ प्रतिबंधित कायदा १९५४ अन्वये तायडे याच्यावर कारवाई करून प्रकर न्यायप्रविष्ट करण्यात आले. सदर प्रकरण न्यायालयात दाखल केले असता सरकारी अभियोक्ता एस.डी. स्थूल यांनी युक्तिवादातून आरोपीने प्रतिबंधित अन्नपदार्थ इथेपॉन या रसायनाचा वापर केळी पिकविण्याकरिता केल्याचे निष्पन्न झाले. यावरून मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने-गाडेकर यांनी आरोपीला एक वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आणखी एक महिना साधा कारवास अशी शिक्षा प्रस्तावित केली आहे. या खटल्याचा पाठपुरावा अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी केला. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न), ज.रा. वाणे यांनी केली.(प्रतिनिधी)
रसायनाने केळी पिकविणाऱ्या फळविक्रेत्याला एक वर्षे कारावास
By admin | Published: February 08, 2017 12:40 AM