लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : -अवकाळी पावसाने रविवारचे रात्री दमदार हजेरी व दुपारपर्यंत सतत अधुन- मधुन हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी आल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. परीसरातील कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या नागपुरसह जिल्ह्यातील बाजार समित्या कोरोनामुळे बंद आहेत. विजांच्या कडकडाटासह पावसाने रविवारी रात्री व दुपारपर्यंत कधी हलक्या तर कधी मध्यम स्वरुपाच्या सरीने हजेरी लावल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांची धावपळ
गेले तीन- चार दिवस ढगाळ वातावरण होते हवेत कमालीचा उकाडा असून पाऊस झाला नाही. पण, शनिवारला दुपारपासुनच वातावरणात अचानक बदल झाला. रविवारचे रात्री व दुपारपर्यंत व सोमवारला तळेगांवसह परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने बळीराजाचे काढलेला शेतीमाल झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली.
कांद्याची काढणी, पावसाची हजेरी संकट वाढवणारी
शेतात उभे असलेले पीक आणि ठिकठिकाणी सध्या कांद्याच्या पिकाची काढणी सुरू आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने तीन ते चार महिने पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेली पिके डोळ्यादेखत भिजल्यानं मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या पिकाचे प्रतवारी घसरणार असून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील होणार आहे.
कांद्याची मागणी घटली
कोरोना महामारी सुरु असल्याने कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात कमालीची दररोज घसरण होत आहे. त्यामुळे कुटुंब चालवावे कसे असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे. आता कांदा उत्पादक शेतकर्याकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकर्यांनी केली आहे .