चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागरिकांना फसविण्यासाठी सायबर चोरट्यांकडून नवनवे फंडे वापरले जात आहे. नागरिकांना झटपट लोन उपलब्ध करून दिले जात असून, ते वसूल करण्याची पद्धत पाहून अनेक जण पोलिसांशी संपर्क साधून फसवणूक झाल्याची माहिती देत असल्याचे दिसून येत आहे. पैशांची गरज असल्याने लोकं बँकेतून काही लोन मिळते का, यासाठी पाठपुरावा करतात, मात्र, बँकेतून सहजरीत्या लोन उपलब्ध होत नाही. लोकांच्या आर्थिक अडचणींचा फायदा सायबर भामटे घेत असल्याचे दिसून येत आहे. लोन देऊन ते वसूल करण्याची नवी पद्धत या चोरट्यांनी आणली आहे. मोबाइलवर लिंक पाठवून त्यावर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगतात. त्याद्वारे आपली वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे जाते. आपणास लोन मंजूर करून ते खात्यावर पाठविले जाते. काही दिवस गेल्यानंतर आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून कर्जदाराची बदनामी केली जाते. मोबाइल नंबर, फोटोचा गैरवापर करून नातेवाईक, मित्र परिवारांना फोन, मेसेज करून आपण कसे बदनाम आहोत, हे सांगितले जाते. बदनामी टाळण्यासाठी लोन मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैशांची मागणी केली जाते. पैसे दिले नाही तर बदनामीची भीती दाखविली जाते. बदनामीच्या भीतीने पैसे भरतात तर काही जण सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी येतात. अलीकडे चार दिवसांत अशा तब्बल ३० ते ३५ तक्रारी सायबर पोलिसांकडे प्राप्त झाल्या.
हे घ्या उदाहरण...युवकाची दीड लाखाची फसवणूक - वर्ध्यातील एका युवकाला लोन किंवा नोकरीचे आमिष देऊन त्याच्या मोबाइलवर लिंक पाठविली. युवकाला त्यावर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरण्यास सांगून सेल्फी पाठविण्यास सांगितले. - युवकाने माहिती पाठविली असता त्याच्या मोबाइलमधील कॉन्टॅक्ट हॅक करून मित्रपरिवार तसेच नातेवाइकांच्या मोबाइलवर तो अत्याचारी आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, अशी बदनामी करण्याचे सांगून ब्लॅकमेल करू लागले. - बदनामीच्या भीतीने त्या युवकाने दीड लाख रुपये भामट्यांना दिले. त्रस्त झालेल्या युवकाने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले, मात्र ही बाब त्याच्या घरच्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली.
केवळ व्हेरिफाइड पाेर्टलवर अर्ज करा सायबर गुन्हेगार अधिकृत वेबसाइटसारखी दिसणारी बनावट वेबसाइट तयार करतात. यानंतर ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी स्वस्त कर्जाच्या ऑफर देऊन वैयक्तिक माहिती घेतात. त्यानंतर बँक डिटेल्स घेऊन ग्राहकांच्या खात्यातून पैसे लुटतात. त्यामुळे ज्या ॲपद्वारे कर्जासाठी अर्ज करीत आहात ती अधिकृत आहे की नाही हे तपासा. तसेच आलेल्या कर्ज ऑफरच्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.
सायबर सेलकडे चार दिवसांत ३० तक्रारी
- पाेलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे झटपट लोन देऊन ते वसूल करण्यासाठी ब्लॅकमेल करण्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे. अवघ्या चार दिवसांत सायबर सेलकडे सुमारे ३० ते ३२ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आहे. - पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, एपीआय महेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनात याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.