शेतकरी त्रस्त : सातबारा काढण्याकरिता होते कसरत श्यामकांत चिचाटे नाचणगाव देशात आधुनिक क्रांती व्हावी व नागरिकांना लवकर सुविधा मिळाव्या या हेतूने सरकारने आॅनलाईन व्यवहाराला चालना दिली. शेती, प्लॉट यांचे खरेदी व्यवहार खरेदी-विक्री कार्यालयात होतात. यातील फेरफार आॅनलाईन पद्धतीने केले जातात;पण संथ इंटरनेटमुळे ही प्रक्रिया डोकेदुखी ठरत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक बसत आहे. सातबारा काढताना शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तहसील कार्यालयात व्यवहार झाल्यावर सदर व्यवहाराचा मॅसेज हा पुणे येथील केंद्रात जातो. त्यानंतर देवळी तहसील कार्यालयात मॅसेज येतो. यानंतर मंडळ कार्यालयात हा मॅसेज पाठविला जातो. अशा तऱ्हेने या खरेदी-विक्री व्यवहारात आॅनलाईन फेरफार होतो. परंतु पुण्यावरुन सदर मॅसेज देवळी कार्यालयाला लवकर प्राप्त होत नसल्याने प्रमाणपत्र घेण्यात व्यत्यय येत आहे. या कार्यालयातून पुलगाव किंवा मंडळ कार्यालयात यायला महिने लागतात. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्राहकाला या प्रक्रियेत खुप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत प्लॉट अथवा शेताच्या फेरफारचा सातबारा घेण्यास ग्राहक गेल्यावर त्याला तो मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. पूर्वी खरेदी-विक्री व्यवहाराची प्रत मंडळ किंवा तलाठी कार्यालयाला द्यावी लागत होती. यानंतर काही दिवसातच फेरफार प्रत मिळत होती. परंतु आॅनलाईन प्रक्रियेत अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. दिवसभर असते लोडिंग सुरूच आॅनलाईनपेक्षा आॅफलाईन पद्धतीने काम लवकर होत असल्याचे दिसत आहे. आॅनलाईन प्रणालीने कामात अडचण होत असल्याने खर्च अधिक होत आहे. त्यामुळे आॅनलाईनपेक्षा आॅफलाईन बरे असे अनेकांना वाटत आहे. कर्मचारी असमर्थ हस्तलिखित सातबारा देण्यात यावा यावर अधिवेशनात चर्चा झाली. परंतु आॅनलाईन फेरफार करण्याकरिता प्रक्रिया झाली नाही तर हस्तलिखीत सातबारा द्यायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आॅनलाईन फेरफार प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नसल्याचे तलाठ्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रासाठी फेरफारचे एकच सॉफ्टवेअर आहे. ते जलदगतीने कार्यान्वित होणे गरजेचे आहे. सकाळी दहा साडेदहापर्यंत सदर प्रणाली व्यवस्थित कार्य करते. परंतु नंतर ही कार्यप्रणाली मंदावते. आॅनलाईनची कामे आता संध्याकाळी करायची काय, अशा प्रश्न तलाठ्यांना पडला आहे. या प्रणालीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त होत आहे.
आॅनलाईन फेरफारने डोकेदुखीत वाढ
By admin | Published: December 22, 2016 12:33 AM