भारत संचार निगमचा प्रतापंतक्रार निवारणाकरिता लागतात १५ ते २० दिवसवर्धा : सध्या दूरध्वनी सेवेला घरघर लागली आहे. यामुळे भारत संचार निगमनेही मोबाईल आणि इंटरनेट जगतात नवीन तंत्रज्ञान आले; पण दूरध्वनी सेवेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. यामुळेच सध्या दूरध्वनी सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संपूर्ण सेवा आॅनलाईन करण्याच्या प्रयत्नात बीएसएनएलने दूरध्वनीच्या तक्रारी सोडविण्यात हयगयच चालविली आहे. यामुळे ग्राहक त्रस्त असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.भारत संचार निगमने सर्वप्रथम दूरध्वनी सेवा सुरू केली. शासनाच्या या प्रथम सेवेला संपूर्ण देशात डोक्यावर घेतले गेले. सर्वाधिक ग्राहक संख्या बीएसएनएलला मिळविता आली. यानंतर मोबाईल क्रांती झाली असून खासगी कंपन्या सरसावल्या. दिवसेंदिवस मोबाईलमध्ये स्पर्धा वाढली आणि संचार निगमची सेवा मागे पडली. या स्पर्धेत टिकण्यासाठी बीएसएनएलनेही मोबाईल जगतात उडी घेतली. शिवाय ब्रॉडबॅन्ड ही इंटरनेट सेवाही सुरू केली. प्रारंभी चांगली वाटणारी ही बीएसएनएलची सेवा नंतर मात्र ढेपाळत गेली. सध्या दूरध्वनी व मोबाईल सेवेसह इंटरनेट सेवाही कुचकामीच ठरत आहे. दूरध्वनीमध्ये वारंवार बिघाड येत असून मोबाईल कव्हरेजअभावी खेळण्याची वस्तू ठरतेय. आजही ग्रामीण भागात संचार निगमचे कव्हरेज मिळत नाही. यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असले तरी शासकीय सेवा असलेल्या बीएसएनएलकडे ग्राहक पाठ फिरवितानाच दिसतात. सध्या दूरध्वनी सेवा सुरू असली तरी ती केवळ इंटरनेट सुविधेकरिताच वापरली जात असल्याचे दिसते. दूरध्वनी सेवेतील वारंवार होणारे बिघाड ग्राहकांचा पाठलाग करीत असल्याचेच दिसते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दूरध्वनी सेवांमध्ये बिघाड येत असून कुणाचे दूरध्वनी संच नादुरूस्त होताहेत तर कुठे केबलमधील बिघाडामुळे ते बंद आहेत. या प्रकारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. कागदमुक्त काम करण्याकरिता संचार निगमने सर्व सेवा आॅनलाईन करण्याचा प्रयत्न केला. बीएसएनएलचा हा प्रयत्नही फसतानाच दिसते. अन्य सिमकार्ड कंपन्यांची आॅनलाईन सेवा सुरळीत सुरू असताना संचार निगमच्या सेवेत बऱ्याच त्रुटी आढळून येतात. दूरध्वनी सेवेतील बिघाडाबाबत तक्रारीसाठी १९८ हा क्रमांक देण्यात आला आहे. यावर तक्रार नोंदविल्यानंतर आठ दिवसांच्या आत तक्रारीचे निरसन होणे अपेक्षित असते; पण यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यातही आॅनलाईन तक्रार नोंदविली जाते. ती संबंधित कार्यालयाकडे सोपविली जाते आणि तेथील अधिकाऱ्यांद्वारे ती तक्रार लागलीच तपासली जात नसल्याने विलंब होतो. शिवाय एका दिवसात सुमारे ३० तक्रारी आल्या तर मनुष्यबळाचा अभाव असल्याने केवळ १० तक्रारींचे निरसन होऊ शकते. यामुळे २० तक्रारी प्रलंबित राहतात. अशा दररोजच्या तक्रारी प्रलंबित राहत असल्याने कित्येक दिवस दूरध्वनी संच केवळ घराची शोभा वाढविताना दिसतो. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)कार्यालयातील तक्रारींना प्रथम प्राधान्य; कर्मचाऱ्यांचाही अभावभारत संचार निगममध्ये सध्या तालुका स्थळी मनुष्यबळ कमी झाले आहे. बिघाड दुरूस्त करण्याकरिता लागणारे कर्मचारीच उपलब्ध नसल्याने एका दिवसात अधिक तक्रारींचे निरसन करणे शक्य होत नाही. कर्मचाऱ्यांचे पथक बिघाड दुरूस्तीसाठी पाठविले जाते; पण कर्मचारी कमी असल्याने ते अधिक ठिकाणी जाऊ शकत नाहीत. यामुळे तक्रार दुरूस्तीचे प्रमाण कमी झाले आहे.आॅनलाईन तक्रारी पाहिल्याच जात नाहीग्राहकांसाठी आॅनलाईन तक्रार क्रमांक देण्यात आला आहे. यावर केलेली तक्रार संबंधित जिल्हा व तालुक्यातील कार्यालयाकडे सोपविली जाते. यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी सदर तक्रार तपासून तेथे कर्मचारी पाठविणे गरजेचे असते; पण कित्येक दिवस या तक्रारी तपासल्याच जात नाहीत. यामुळे तक्रार करूनही दूरध्वनी संच सुरू होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.अधिकारीही हतबलग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करतात; पण वारंवार बिघाड येत असल्याने तेही हतबल झाले आहेत. दूरध्वनीच्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या तक्रारी दूर करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसते. शिवाय बिघाड लवकर दुरूस्त होत नसल्याने ग्राहकांना दूरध्वनी सेवा नकोशी झाल्याचे चित्र आहे. आॅनलाईन तक्रारी बिघाडाच्या प्रकारावर अवलंबून असतात. मोठा आणि जमिनीच्या आतील बिघाड असेल तर मिटर लावून लोकेट करावा लागतो. या प्रकारच्या तक्ररी एकदा दूर झाल्या की त्या वारंवार उद्भवत नाही. अन्य तक्रारी नोंदणी करताच सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. कर्मचारीही तत्परच असतात.- एच.के. चव्हाण, उपविभागीय अधिकारी, भारत संचार निगम लि. वर्धा.
आॅनलाईन सेवा ठरतेय कुचकामी
By admin | Published: July 06, 2015 2:21 AM