रूपेश खैरी वर्धाउन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील जलशायची स्थिती खालावली आहे. एकूण १४ जलाशयात आजस्थितीला सरासरी केवळ १८.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मंगळवारी नोंद झालेल्या पाण्याच्या या पातळीमुळे पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याचे संकेत मिळत आहे. ही स्थिती मार्च महिन्याची असून पारा ३९ अंशावर स्थिरावत आहे. एप्रिल महिना उजाडत असला तरी मे, जून महिना अद्याप बाकी आहे. या दोन महिन्यात तापणाऱ्या कडाक्याच्या उन्हात जिल्ह्यातील जलाशयात पाणी राहील अथवा नाही याबाबत शंकाच निर्माण होत आहे. यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश स्थिती आहे. पावसाच्या दडीचा विपरीत परिणात शेतीवर झाल्याने महसूल विभागाच्यावतीने सर्व्हे झाला. यात सुमारे एक हजार ३६१ गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे जलसाठ्यांचीही हीच अवस्था आहे. जिल्ह्यातील मोठ्या जलाशयाची पातळीही खालावली आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत अप्पर वर्धाच्या ऊर्ध्व प्रकल्पात सर्वाधिक ३६.७१ टक्के जलसाठा आहे. तर सर्वात कमी पाणी लालनाला प्रकल्पात असल्याची नोंद आहे. येथे ३.०३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उपलब्ध असलेला जलसाठा वापरात येऊ शकतो अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे. नांद प्रकल्प कोरडा झाला असून पोथरा व लालनाला कोरडा पडण्याच्या मार्गावर आला आहे. इतर जलाशयात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यात उद्योगाकरिता, पिण्याकरिता व शेतीकरिता पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. यात सध्या शेतीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर असल्याने शेतीला पाणी लागणार नसल्याचे बोलले जात आहे. तर जिल्ह्यात असलेल्या एकमेव मोठ्या उद्योगाकरिता पूर्वीपासूनच पाणी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यात ृएकमेव धाम प्रकल्पात पिण्याकरिता पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे पाण्याचा उपसा सुरूच आहे. पारगोठाण, परसोडीत ठणठणाट जिल्ह्यात असलेल्या २० लघु प्रकल्पापैकी पारगोठाण व परसोडीत पाण्याचा ठणठणाट आहे. उर्वरित १८ प्रकल्पात सरासरी २५.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. असलेले पाणी वापरण्यायोग्य आहे अथवा नाही हे सांगणेही कठीण आहे. शिल्लक असलेल्या पाण्यात गाळ असल्याने ते वापरणे शक्य नाही.
१४ जलाशयांत केवळ १९ टक्केच जलसाठा
By admin | Published: April 01, 2015 1:46 AM