लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. इतकेच नव्हे तर त्याची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यातही केली जात आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्याला ४ लाख ७६ हजार ५१४ व्यक्तींची नोंदणी करून कार्ड वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पण आतापर्यंत केवळ २७.१० टक्केच व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सेवा पंधरवडा राबवून विविध योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. पण याच सेवा पंधरवड्यात आतापर्यंत केवळ २१२ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
केवळ १,२९,१६८ व्यक्तींनीच घेतले कार्ड- गरीब आणि गरजूंसाठी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना फायद्याची आहे; पण वास्तविक पाहता उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १ लाख २९ हजार १६८ व्यक्तींना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित झाले आहे.
नवीन नोंदणी बंदचप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड मिळविण्यासाठी नवीन नोंदणी बंद आहे; पण ज्यांची यापूर्वी नोंदणी झाली आहे, मात्र कार्ड मिळाले नाही अशांना नजीकच्या ई-सेवा केंद्रात जाऊन ते सहज प्राप्त करता येत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत मिळतेय सेवा- जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ गरजू व गरिबांना दिला जात आहे. यात सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय, कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय, हिंगणघाट येथील लोढा हॉस्पिटल, आर्वी येथील राणे हॉस्पिटल तसेच हिंगणघाट येथील अरिहंत डायलेसीस सेंटरचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ठरतेय दिलासा देणारी- २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीचा विचार केल्यास महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा जिल्ह्यातील तब्बल २० हजार ७५४ गरजूंना लाभ देण्यात आला आहे. एकूणच ही योजना गरजू व गरिबांसाठी दिलासा देणारीच ठरत आहे.
लिंक फेल होत असल्याने उद्भवतेय वेळोवेळी अडचणसुरू असलेल्या सेवा पंधरवड्यात जास्तीत जास्त नागरिकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड वितरित करण्याचा मानस अधिकाऱ्यांचा असला तरी वेळोवेळी लिंक फेल होत असल्याने याचा नाहक त्रास चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोसावा लागत आहे.
एप्रिल २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा २० हजार ७५४ गरजूंना लाभ देण्यात आला आहे. तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी जिल्ह्याला ४ लाख ७६ हजार ५१४ इतके उद्दिष्ट असून, आतापर्यंत १ लाख २९ हजार १६८ व्यक्तींना कार्ड वितरित करण्यात आले आहे.- डॉ. स्मिता हिवरे, जिल्हा समन्वयक, वर्धा