रूपेश खैरी वर्धाबालकांवर होत असलेले अत्याचार रोखण्याकरिता प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या ग्रामसभेत गाव बालसंरक्षण समितीचे गठण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यात या समितींचे गठण करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली; मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारमुळे या समितीचे गठण करण्याबाबत उदासिनताच असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला केवळ २७६ गावात या समितीचे गठण झाल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे आली आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्वच ग्रामपंचायत व नगरपरिषदेत या समितीचे गठण होणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे बालकांच्या संरक्षणाबाबत जिल्हा किती उदासिन आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. या समितीच्या गठणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या. त्यांच्या सुचनांनाही केराची टोपली दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे.शासनाच्यावतीने बालकांना संरक्षण मिळावे, बालमजुरी कमी व्हावी याकरिता विविध उपाय योजना आखण्यात येत आहेत. शिवाय तसे कायदेही तयार होत आहेत; मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता असलेल्या विभांगाकडून त्याला बगल दिली जात असल्याने हे कायदे कुचकामी ठरत आहेत. कायदे करून बालकांच्या समस्या सुटणार नाही हे लक्षात आल्यावर शासनाच्यावतीने ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत बालकांचे संरक्षण व्हावे याकरिता गाव बालसंरक्षण समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढत प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेत गाव बालसंरक्षण समिती गठीत करण्याच्या निर्णयाची माहिती सर्वांना दिली. त्या सूचना प्रशासकीय यंत्रणेद्वारे ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या; मात्र त्या कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अद्यापही बऱ्याच गावात या समितीचे गठण झाले नसल्याचे समोर येत आहे. कारंजा (घाडगे), आष्टी, समुद्रपूर, देवळी, आर्वी व सेलू या तालुक्यातील काही गावात समितीचे गठण झाल्याची माहिती आहे. तर वर्धेसह हिंगणघाट येथे समितीचे गठण झाल्याची कुठलीही माहिती बालसंरक्षण कक्षाकडे आलेली नाही. जिल्ह्यात असलेल्या सहा नगर पालिका क्षेत्रापैकी देवळी व सिंदी (रेल्वे) येथे प्रत्येकी चार समितीचे गठण झाल्याची माहिती आहे. समितीच्या गठणाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून केवळ मौखिक माहिती देण्यात येत असल्याचे संबंधीत विभागाकडून सांगण्यात आले आहे. ही माहिती देण्याकरिता बालसंरक्षण कक्षाकडून पत्रव्यवहारही करण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र बऱ्याच गावातून त्याला उत्तर मिळाले नसल्याची माहिती आहे.
केवळ २७६ गाव बालसंरक्षण समितींचे गठण
By admin | Published: April 08, 2015 1:46 AM