लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकाच क्लिकवर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी तसेच विविध योजनेचा लाभ घेता यावा या हेतूला केंद्रस्थानी ठेवून शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे. पण या पोर्टलबाबत प्रभावी जनजागृती करण्याकडे कृषी विभाग दुर्लक्षच करण्यात धन्यता मानत असल्याने आतापर्यंत केवळ ४ हजार २९० शेतकऱ्यांनी या पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकूण २ लाख ४८ हजार शेतकरी असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा झटपट लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्याचे निश्चित करून ऑगस्ट महिन्यापासून ते सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर गेल्यावर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळते. त्यानंतर इच्छूक शेतकरी शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेवू इच्छित असल्यास त्याला नोंदणी करता येते. नोंदणी करताना शेतकऱ्याला केवळ आधार कार्ड आणि सातबारा तसेच आठ अ अपलोड करणे क्रमप्राप्त असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
निवडीनंतर कागदपत्र गुरूवार ३१ डिसेंबर ही नोंदणी करण्याची अखेरची मुदत असून त्यानंतर योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा, आठ अ, खरेदी करावयाच्या कृषी अवजाराचे कोटेशन, मान्यता प्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, जातीचा दाखला, स्वयं घोषणापत्र, पूर्व संमतीपत्र आदी कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत हे विषेश.
इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत नोंदणी करावीजिल्ह्यात एकूण २ लाख ४८ हजार शेतकरी असून आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार २०९ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जावून नोंदणी करावी.- अनिल इंगळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.
या योजनांच्या लाभासाठी करता येताे ऑनलाईन अर्जएकाच क्लिकवर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरास मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आदीची माहिती मिळत असून त्या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जही सादर करता येतो.
नोंदणी करणे सोपेचशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याने ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे अतिशय सोपे आहे. नोंदणी करताना केवळ आधारकार्ड, सातबारा आणि आठ अ अपलोड करणे क्रमप्राप्त आहे.