प्रवाश्यांना त्रास : सर्वांना घ्यावा लागतो झाडांचा आसरानाचणगाव : नजीकच्या कोळोणा (चोरे) येथील प्रवासी निवाऱ्यावरील सिमेंट पत्रे तुटल्याने प्रवासी निवारा निरूपयोगी झाला आहे. त्यावर तातडीने नवे टिनपत्रे बसवून तो उपयोगात येईल, अशी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे. गावापासून एक कि़मी. च्या अंतरावर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. सदर बांधकाम बरेच जुने असल्याने व त्यावरील सिमेंटच्या टिना तुटल्यामुळे त्याची दुरवस्था होऊन केवळ अवशेष उरले आहे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात प्रवाश्यांना आधार मिळावा तसेच बसची प्रतीक्षा करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार झालेल्या प्रवासी निवाऱ्याचे सिमेंट पत्रे तुटल्यामुळे हा निवारा निरुपयोगी आहे. या निवाऱ्याचा वापर कुणीही प्रवासी करीत नाही. त्यामुळे तो ओस पडला असून त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. उन्हापावसात प्रवाश्यांना आसपाच्या झाडा झुडपाचा आश्रय घ्यावा लागतो.ही बाब लक्षात घेऊन तातडीने प्रवाशी निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नरेश ओंकर, बबन ओंकार, सम्यक ओंकार, युवराज पोहेकार, रमेश चौधरी, देवानंद वागदे, विजय नगराळे, नितीन मानकर, वाल्मिक बोबडे, शुक्रचारी इंगळे, प्रवीण नगराळे तसेच विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली असून तात्काळ पूर्ण करण्याची गरज आहे.(वार्ताहर)
निवाऱ्यावरील सिमेंट पत्र्याचे उरले केवळ अवशेष
By admin | Published: October 28, 2015 2:29 AM