लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील १८ वाळूघाटांच्या लिलावाकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये केवळ तीन घाटांकरिताच सहा जणांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यामुळे तिन्ही घाटांचा वर्षभराकरिता ४ कोटी ९१ लाख २ हजार ८२८ रुपयांमध्ये लिलाव झाला असून उर्वरित १५ घाटांकरिता फेरलिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी, आर्वी, देवळी या पाच तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, वणा व यशोदा नदी पात्रावरील ३७ वाळूघाट लिलावास पात्र ठरविण्यात आले होते. त्यापैकी २९ वाळू घाटांना पर्यावरण अनुमती दिल्याने या घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु यातील जवळपास दहा घाट शासकीय कामांकरिता राखीव ठेवण्यात आल्याने ९ फेब्रुवारीला १८ घाटांचा ई-लिलाव करण्यात आला. यामध्ये देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई), टाकळी (चना), हिंगणघाटमधील जुनोना, बोरगाव (दातार), चिकमोह, टेंभा-परसोडी, घाटसावली, चिंचोली, खारडी-भारडी, काजळसरा, गणेशपूर-बोरखेडी तर समुद्रपूर तालुक्यातील शेकापूर (बाई), खुनी-वदली-सेवा, मांडगाव-२, मनगाव, बरबडी, उमरा-औरंगपूर रिठ, औरंगपूर रिठ-उमरा, चाकूर आणि पारडी या घाटांचा समावेश होता. परंतू जिल्ह्यात राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध वाळू उपस्यामुळे शेकापूर (बाई), मांडगाव-२ आणि मनगाव या तीनच घाटांचा लिलाव झाला. त्यामुळे शासनाच्या तिजोरीतही महसूलाचा ठणठणाट असल्याने दिसून येत आहे.
या कारणांमुळे लिलावधारकांनी निविदा भरण्याकडे फिरविली पाठ जिल्ह्यात वणा आणि वर्धा नदीपात्रातून सर्वाधिक वाळू उपसा होतो. वर्धा नदीपात्रावर अमरावती व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा आहेत.लगतच्या जिल्ह्यात पूर्वीच घाटांचे लिलाव झाल्यामुळे त्यांनी वर्धा जिल्ह्यातील लिलावाकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.यावर्षी उशिराने घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे घाटधारकांनाही कमी कालावधी मिळणार असल्याने घाटाकरिता निविदा प्राप्त झाल्या नाहीत. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु असल्याने सहजच वाळू उपलब्ध होत आहे. त्यामुळेही लिलावाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.जिल्ह्यातील पाच वाळूघाट शासकीय बांधकामाकरिता राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे घाटधारकांकडून शासकीय कामाकरिता वाळू घेतली जाणार नसल्याने घाटधारकांनी यावर्षी लिलाव घेण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
यांनी लावली सर्वाधिक बोली हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील घाटकरिता तिघांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यातील लक्ष्मी इन्फ्रा या निविदाधारकाने १ कोटी ५५ लाख २९ हजार ९४८ रुपयात हा घाट घेतला. समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव-२ आणि मनगांव या दोन घाटांचा लिलाव झाला. मांडगाव येथील घाटाकरिता एकच निविदा प्राप्त झाली होती. मॉ दुर्गा ट्रेडर्सने हा घाट २ कोटी ९ लाख ११ हजार ८०० रुपयांमध्ये घेतला आहे. तर मनगाव येथील घाटाकरिता दोन निविदा प्राप्त झाल्यात. त्यामध्ये सुहानी बिल्डींग मटेरियल सप्लायर्सने १ कोटी २६ लाख ६१ हजार ८० रुपयात वाळू घाट घेतला आहे.