वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात नेत्यांच्या सभांचा धुरळा उडत आहे. दररोज कुठे ना कुठे सभा होत आहे. त्यामुळे खुद्द उमेदवारांचीही दमछाक होताना दिसून येत आहे.
लाकसभेसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आता जाहीर प्रचारासाठी केवळ मंगळवार आणि बुधवार हे दोनच दिवस उरले आहे. बुधवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावणार आहे. त्यानंतर मूक प्रचाराला सुरूवात होईल. तत्पूर्वी विविध नेत्यांना आपल्या मतदारसंघात आणून मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न करताना उमेदवार दिसून येत आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना मतदारसंघात पाचारण केले जात आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मतदारसंघात दररोज कुठे ना कुठे मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहे.
चार दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तळेगाव येथे सभा झाली. त्यानंतर रविवारी वर्धा लोकसभा मतदारसंघातील वरूड परिसरात खासदार शरद पवार यांची सभा झाली. याच दिवशी आर्वी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. विशेष म्हणजे याच दिवशी सायंकाळी पुन्हा सिंदी रेल्वे येथे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचीही सभा पार पडली. या सभा होत नाही तोच सोमवारी हिंगणघाटमध्ये माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार शरद पवार, खासदार संजय सिंग यांची सभा झाली. सोमवारी सायंकाळीच आंजी मोठी व सेलू येथे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही सभा झाली. एकूण काय तर दररोज कुठे ना कुठे सभांचा धुरळा उडत आहे. दररोज नेत्यांच्या सभा होत असल्याने उमेदवारांचीही धावपळ होत आहे. एक सभा होण्यापूर्वीच त्यांना दुसऱ्या नेत्यांच्या सभेला जावे लागत आहे. त्यांना धावपळ करीत सभेला पोहोचावे लागत आहे.
धाकधूक वाढली, काय होणार ?मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नेत्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघून विजय, पराजयाचे दावे केले जात आहे. मतदार केवळ नेत्यांचे भाषण ऐकण्यात दंग आहे. त्यांनी अद्याप आपले पत्ते उघड केले नाही. त्यांच्या मनातील गुपीत कुणीच ओळखू शकत नाही. त्यामुळे नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ४ जूनलाच खरे काय ते समजणार आहे.