जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आर्वीतील पावडे नर्सिंग होम तोडफोड प्रकरण वर्धा : रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करीत शिवसेना जिल्हा प्रमुखाने आर्वी येथील पावडे नर्सिंग होममध्ये तोडफोड केली. यामुळे नागरिकांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हणत येत्या सोमवारपासून वर्धेतील डॉक्टर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करणार असल्याचे निवेदन निमाच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आर्वी येथील प्रकरणात डॉ. पावडे दाम्पत्याच्या अधिकारात येत असलेल्या पावडे नर्सिंग होमची तोडफोड करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हणत डॉ. पावडे यांनी आर्वी पोलिसात शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकाराला चार दिवसांचा कालावधी होत असला तरी पोलीस विभागाकडून जिल्हा प्रमुखाला अटक करण्यात हलगर्जी करीत असल्याचा आरोप वैद्यकीय संघटनांकडून निवेदनातून करण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी आएमए, आयडीए, निमा, डब्ल्यूडीए, एचएमएआय, डब्ल्यूडीसीए व एमएसएमआरए संघटनेचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी) खासदारांनाही साकडे या प्रकरणी वर्धेतील डॉक्टरांनी शिवसेना जिल्हा प्रमुखावर कारवाई करण्यासंदर्भात खा. रामदास तडस यांना निवेदन दिले. डॉक्टरांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, सदस्य राणा रणनवरे यांची उपस्थिती होती. या विषयावर खासदारांशी चर्चा झाली असून त्यांनी प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले. या प्रकरणी कारवाईच्या सूचना देण्याचे आश्वासन खा. तडस यांनी दिले.
सोमवारपासून एसपी कार्यालयात लागणार ओपीडी
By admin | Published: July 17, 2016 12:27 AM