वर्धा :वर्धा शहरातील गोल बाजार परिसरात ‘अंकुर’ नामक सटोडीकडून खुलेआम सट्टा मटका जुगार भरविला जात असल्याची खमंग चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्याने सर्वच सटोड्यांचे दुकान बंद केले असल्याचीही जोरात चर्चा आहे. त्यामुळे ‘ओपन जेऊ देईना अन् क्लोज झोपू देईना’ असेच काहीसे चित्र शहरातील नागरिकांचे असल्याचे दिसून येत आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क करुन विचारणा केली असता त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला हे विशेष.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले. काही सटोड्यांनी जिल्ह्यातून पळ काढला. तर काही जण अंडरग्राऊंड झालेत. तर काहींना पोलिसी खाक्या दाखवून कारागृहाची हवा खाऊ घातली आहे. मात्र, महादेवपुरा येथील गोलबाजार परिसरात ‘अंकुर’ नामक तरुण सध्या ‘वन साईड’ सट्टा, मटका जुगार चालवीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे पोलिस याकडे लक्ष देणार का, हा प्रश्न नागरिकांतून विचारला जातो आहे.
दोन रुपये कमीने खायवाडी
शहरात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टी व मटका जुगार चालविणारे आहेत. काही जण अंडरग्राऊंड तर काही जणांनी जिल्ह्यातून पलायन केले आहे. जे चोरी छुपे सट्टा, मटका, जुगार चालवीत होते, त्यांनादेखील ‘अंकुर’ने मागे टाकत स्वत:चे वर्चस्व निर्माण केले आहे. बाकी सटोड्यांपेक्षा तो दोन रुपये कमीने घेऊन जास्त नफा देत असल्याने शहरातील अनेक सट्टा बाजार चालविणाऱ्यांचे दुकान बंद झाल्याची माहिती आहे.
सागर अन् समीर सांभाळतो व्यवहार
सटोडी अंकुर यांचा संपूर्ण आर्थिक व्यवहार छत्रपती शिवाजी महाराज चौकात वावरत असलेला सागर आणि आर्वी नाका परिसरात वावरत असलेला समीर सांभाळतो. दररोज कोटी रुपयांची उलाढाल अंकुर करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
पोलिस अभिलेखावर यापूर्वीही गुन्हे दाखल
अंकुर नामक सटोडीवर यापूर्वीही जुगार आणि सट्टापट्टी तसेच मटका जुगार चालविण्याबाबतचे गुन्हे पोलिस दप्तरी दाखल असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनीच आता याकडे लक्ष देत कारवाई करण्याची गरज आहे.