जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवातही भोंगळ कारभार : शालेय विद्यार्थ्यांसोबत जिल्हा परिषद प्रशासनाचा असाही खेळ वर्धा : जिल्हा परिषद शाळांच्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांना शालेय विद्यार्थ्यांना मालवाहूतून नेले. ही बाब ‘लोकमत’ उजेडात आणताच एकच खळबळ उडाली होती. यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाचे यापासून बोध घेतला नसल्याची बाब वडनेर येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवातून स्पष्ट झाली. महोत्सवाच्या उद्घाटनाची वेळ दुपारी १२ वाजताची असताना ते तब्बल तीन तासांनी झाले. यानंतर तब्बल दोन तास लेझीम कवायती व अन्य कार्यक्रम झाले. सायंकाळी अंधार पडल्यानंतर स्पर्धांना सुरुवात झाली. रात्री १२ वाजतापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडल्यानंतर रात्री १ वाजता विद्यार्थ्यांना जेवण मिळाले तेही गरम करुन. उल्लेखनीय बाब म्हणजे, या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांची गैरहजेरीही अनेकांना खटकली. एकूणच ढिसाळ आणि बेजबजाबदार नियोजनाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव गुरुवारपासून वडनेर येथे सुरू झाला. ही क्रीडा स्पर्धा जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात होणार असल्याने त्याला प्रारंभी विरोध झाला. मात्र या विरोधाला न जुमानता शिक्षण विभागाने वडनेर हे गाव स्पर्धेकरिता कायम ठेवले. या स्पर्धेला शुक्रवारपासून सुरू असल्याने आठही पंचायत समितीतील शाळा यात सहभागी झाल्या. स्पर्धा एका कोपऱ्यावर असल्याने येथे पोहोचण्याकरिता दुपार झाली. यातच स्पर्धेच्या नियोजनशून्यतमुळे उद्घाटनाचा कार्यक्रम तीन तास लांबला. दुपारी संपणारी स्पर्धा सायंकाळी संपली. थंडीच्या दिवसात रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम वर्धा : थंडीचे दिवस असल्याने उर्वरीत कार्यकम सायंकाळी घेण्याचे टाळून ते दुसऱ्या दिवशी लवकर घेणे क्रमप्राप्त असताना थंडीतच इतर कार्यक्रम पार पडले. यावेळी आयोजकांकडून कायदा धाब्यावर बसवून तब्बल रात्री १२ वाजतापर्यंत कार्यक्रम घेतले. याकडे येथील पोलीस विभागाकडूनही दुर्लक्ष झाले, याचेच नवल. हे कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रात्री १ वाजेपर्यंत जेवण देण्यात आले. यातही आदेशित असलेल्या मेनूला बगल देत पातळ वरण व पोळ्याच या विद्यार्थ्यांच्या पुढ्यात ठेवण्यात आल्या. विद्यार्थ्यांकरिता दुपारी असलेल्या आयोजनातील मेनूवर आमंत्रित असलेल्या पाहुण्यांनी व त्यांच्यासह आलेल्या कार्यकर्त्यांनी ताव मारला. विद्यार्थ्यांकरिता रिकामी भांडीच पहावयाला मिळाली. जिल्हा परिषदेकडून या क्रीडा स्पर्धेकरिता थोडे थोडके नाही तर १० लाख रुपयांचे अनुदान आहे. या रकमेत उत्तम सोय करणे शक्य असताना असला प्रकार घडत असल्याबाबत काही शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलेच शिवाय नियोजन योग्य आहे ना नाही याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही तेवढीच होती. तालुका स्पर्धांना विद्यार्थ्यांची मालवाहूतून वाहतूक व आता निकृष्ठ जेवण यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांप्रती जिल्हा परिषद प्रशासनाची उदासीनता स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
उद्घाटन तीन तास उशिरा, जेवण रात्री १ वाजता तेही गरम करुन!
By admin | Published: January 07, 2017 12:47 AM