टाकरखेड ग्रामपंचायत : उपसरपंचाची गटविकास अधिकाऱ्यांना तक्रारटाकरखेड : येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तीन महिन्यांपासून गैरहजर असल्याने विकास कामांत व्यत्यय निर्माण झाला आहे. असे असले तरी सर्व आर्थिक व्यवहारांवर सरपंच यांच्या सह्या घेतल्या जातात. मासिक सभा, ग्रामसभा उपसरपंचाच्या अध्यक्षतेत होत आहे. सरपंच यांच्या गैरहजेरीत सर्व अधिकार उपसरपंचाला असतात; पण हेतुपुरस्सर डावलले जात आहे, असा आरोप उपसरपंच वैशाली भुरभुरे यांनी केली आहे. याकडे लक्ष देत कार्यवाहीची मागणीही त्यांनी केली.सध्या ग्रा.पं. बेताल कारभार सुरु आहे. सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, असेही उपसरपंच भुरभुरे यांनी तक्रारीतून पं.स. गटविकास अधिकारी यांना कळविले आहे. ६ जुलै रोजी सरपंच तुषार मानकर यांचा अपघात झाला. ते आजारी आहेत. तेव्हापासून ते गावात नाहीत. बाहेरगावी उपचार घेत आहेत. यामुळे मासिक सभा, ग्रामसभा उपसरपंच वैशाली भुरभुरे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आल्या; पण सर्व आर्थिक व्यवहार सरपंच यांच्या सहीने होत आहेत. ७ सप्टेंबरची मासिक सभा काढण्यात आली. त्या नोटीसवर सरपंच यांच्या सह्या घेण्यात आल्या. वास्तवित त्या सभेलाही ते उपस्थित नव्हते. जी व्यक्ती गावात हजर नाही, सभेला येऊ शकत नाही त्यांच्याच सहीने सर्व कामे होत असतील तर उपसरपंच यांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे गावातील विकास कामे ठप्प झाली आहेत. बाहेर गावाहून कारभार चालत असतील तर स्थानिक लोकप्रतिनिधींचे कामच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावात अनेक समस्या असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सरपंच सक्षम असतील तर त्यांनी गावात राहून स्वत: ग्रा.पं. मध्ये सभेला उपस्थित राहून कामकाज करावे, अन्यथा पदभार सोपवावा, अशी मागणीही भुरभुरे यांनी निवेदनातून केली आहे. याबाबत ग्रामसेविका मेघा कोळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी स्विच आॅफ होता.(वार्ताहर)
सरपंचाच्या गैरहजेरीतच चालतोय गावाचा कारभार
By admin | Published: September 14, 2016 12:51 AM