वर्धा: ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.यावेळी पुढे बोलताना त्यांनी, पाच वर्षात आम्ही जी कामे केली त्याने सर्व प्रश्न सुटले असा आमचा दावा नाही. मात्र येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यावर आमचा विशेष भर राहणार असल्याचे म्हटले. तेलंगणातून 880 किमीची टनेल बुलडाण्यापर्यंत बनवण्याची योजना असून, त्याचा फायदा पूर्व व पश्चिम विदर्भातील एकूण आठ जिल्ह्यांना होणार आहे. तसेच गोदावरीतील 167 टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्राला पुरवण्याची योजना असून त्यासाठी मोठा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जागा वाटपाबाबत बोलताना त्यांनी, यावर नंतर निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
ईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 11:16 AM