वर्धा : पोस्टाच्या परीक्षेकरिता असलेल्या सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात रविवारी परीक्षा देण्याकरिता आलेल्या अनेक बेरोजगार युवक-युवतींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. परीक्षेच्या हॉल तिकिटासह इतर दुसरे ओळखपत्र नसल्याने या परीक्षार्थ्यांना परीक्षा देण्यापासून मज्जाव करण्यात आला. परीक्षा देण्याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षकाला विनंती केली असता त्यांनी ती धुडकावून लावली. केंद्र शासनाच्या पोस्ट विभागात पोस्टमन या जागेकरिता रविवारी परीक्षा होती. यात जिल्ह्यातीलच नाही तर इतर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी परीक्षेचा आॅनलाईन अर्ज भरला. यामुळे आॅनलाईनच हॉल तिकीट आली. परीक्षा देण्याकरिता हॉल तिकीट तर महत्त्वाचे आहेच शिवाय या हॉल तिकिटावर दुसरे एखादे ओळखपत्र आणण्याच्या सूचना नसमूद करण्यात आल्या होत्या. ठरलेल्या या पदाकरिता यानुसार रविवारी परीक्षा होती. वर्धेतील विविध महाविद्यालय या परीक्षेकरिता केंद्र देण्यात आले होते. यात सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय एक केंद्र होते. दुपारी ३ वाजता परीक्षा असल्याने काही काळपूर्वीच परीक्षार्थी येथे पोहोचले. यावेळी त्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना खोलीत बसविण्यात आले. यावेळी ओळखपत्रासह दुसरे एखादे ओळखपत्र दाखविण्याची मागणी केंद्रावर करण्यात आली. यावेळी परीक्षार्थ्यांनी याच ओळखपत्रावर परीक्षेला उपस्थित राहू देण्याची मागणी केली. मात्र ज्यांच्याकडे दुसरे ओळखपत्र नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला. इतर परीक्षा केंद्राचर मात्र असा प्रकार झाला नसल्याची ओरड यावेळी करण्यात आली. शिवाय काही परीक्षार्थ्यांना परीक्षेदरम्यान हॉल तिकीट तपासून अर्धा पेपर सोडविल्यानंतर बाहेर काढण्यात आले. त्यांना तुम्ही जेवढा पेपर सोडविला तेवढा जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. यावर संतापलेल्या विद्यार्थ्यांना आम्हाला परीक्षेला उपस्थित राहण्याची विनवणी केंद्राच्या पर्यवेक्षकाला केली. त्यांना इतर केंद्रावर असे नसल्याचे सांंगितले; मात्र त्यांनी यावर थेट नकार दिल्याने विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागले. पेपर संपताच पेपर फुटल्याची चर्चा जोरात झाली. याच परीक्षा केंद्रावर असलेल्या एका युवकाच्या मोबाईलवर एका प्रश्नाचे उत्तर वॉट्स अॅपवर आल्याची चर्चा जोरात असून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी होत होती. (प्रतिनिधी)
शंभरावर परीक्षार्थी केंद्राबाहेर
By admin | Published: March 30, 2015 1:45 AM