लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पवनार येथील एका शेतकऱ्याकडील दोन बदके मृतावस्थेत आढळली. या बदकांचा अहवाल तपासणीकरिता पाठविला असता तो पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातही आता बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे.
पवनार येथील जगदीश वाघमारे यांच्या शेतामध्ये बारा बदके होती. १४ जानेवारीला त्यातील दोन बदके मृतावस्थेत आढळल्याने त्यांनी पशुसंवर्धन विभागाला याची सूचना दिली. पशुसंवर्धन विभागाने १५ जानेवारीला या दोन्ही बदकाचे अहवाल तपासणीकरिता पुण्याला पाठविले. यादरम्यान आणखी दोन बदकाचा मृत्यू झाला. २० जानेवारीला मृत बदकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसवंर्धन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांचा परवानगीने घटनास्थळापासून १ किलो मीटरच्या परिसराला संक्रमित क्षेत्र घोषित करुन त्या परिसरातील पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, या परिसरात महाजन यांच्या शेताव्यतिरिक्त कुठेही पक्षी नसल्याने त्यांच्या शेतातील उर्वरित आठ बदके गुरुवारी मारण्यात आली. तसेच त्या सर्व मृत बदकाची विल्हेवाट लावली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन विभागचे उपायुक्त डॉ. प्रवीण दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, सहायक आयुक्त डॉ. राजेश वासनिक, डॉ. सुहास अलोने, पवनारच्या सरपंच शालिनी आदमने, सचिव अविनाश ढमाले व शेतमालक जगदीश वाघमारे उपस्थित होते.