लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या शेंडे कुटुंबातील आई व मुलावर नागपूर येथे उपचार सुरू असताना दहा ते बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या दु:खातून कुटुंब सावरत नाही तोच धाकट्या मुलाने आपला श्वास सोडल्याने शेंडे कुटुंब दु:ख सागरात लोटले असून ही घटना मन हेलावून टाकणारी आहे.
बुलडाणा अर्बन बँकेच्या वर्धा शाखेत कार्यरत असलेल्या कैलास मारोतराव शेंडे (४४) यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ७ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ९ मे रोजी मातृदिनीच लगतच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या त्यांच्या आईला मुलाच्या निधनाचा धक्का बसल्याने त्यांनीही आपला प्राण त्यागला. आई व मुलाच्या निधनाचे दु:ख उराशी असतानाच लहान भाऊ कैलास विलास शेंडे यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला. ते सेलू येथे काही दिवस गृहविलगीकरणात होते. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. बुधवारी १९ रोजी उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने शेंडे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कैलास यांच्या मागे पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी तर विलास यांच्या मागे पत्नी, पाच वर्षांचा मुलगा व अडीच वर्षांची मुलगी आहे. शेंडे कुटुंबात दोन विवाहित मुले व आई यांच्या मृत्यूने संकट ओढवले असून या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.