लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पावसाचे भाकित केले होते; पण विदर्भासाठी ते फोल ठरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ६५ टक्के पाऊस झाला असून २५ टक्के तूट आहे. एकूण पर्जन्यमानाचा विचार केल्यास ही तूट ४० टक्केच्या घरात आहे. आता सप्टेंबर महिना सुरू झाल्याने तूट भरून निघणे कठीण मानले जात आहे. परिणामी, पिकांवर विविध रोग, अळ्यांनी आक्रमण केले असून रबी हंगाम धोक्यात आला आहे.वर्धा जिल्ह्यात सरासरी ९२०.७१ मिली मीटर पावसाची नोंद होते; पण मागील वर्षीपासून पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. गतवर्षी ८३०.६३ मिमी तर यंदा आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत केवळ ६००.३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी २५.१ टक्के पाऊस कमी पडला असून एकूण सरासरीचा विचार केला तर ४० टक्केपेक्षा अधिक पाऊस कमी झाला आहे. अत्यल्प पावसाचा पिकांसह पूढील हंगाम आणि उन्हाळ्यातील पाणी वितरणावर विपरित परिणाम होणार आहे. यासाठी सिंचन विभागाला नियोजन करावे लागणार असून रबी हंगामातील पाणी पाळ्यांमध्ये कपात करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जात आहे.अत्यल्प पावसामुळे पिकांवर मोठेच संकट ओढवले आहे. जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीन हे मुख्य पीक मानले जाते. या पिकांवरच शेतकºयांची भिस्त असते. सध्या ही पिके फुलांवर, पातीवर असताना अळ्यांचा प्रकोप वाढला आहे. परिणामी, उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ९७ टक्के आणि नियोजनाच्या ९९ टक्के पेरणी झालेली आहे. दुबार पेरणी झाली नसल्याचे कृषी विभाग सांगत असले तरी शेतकºयांनी मात्र दुबार, तिबार पेरणी करावी लागल्याची ओरड होत आहे. आता कष्टाने फुलविलेल्या पिकांवर अळ्यांचा प्रकोप दिसत असल्याने शेतकरी धायकुतीला आले आहेत. मुसळधार पाऊस न आल्यास पिकांची स्थिती कठीण असल्याचेच बोलले जात आहे.तीनही उपविभागांमधील पिकांवर रोगांचे आक्रमणजिल्ह्यातील आर्वी, वर्धा आणि हिंगणघाट या तीनही उपविभागांमध्ये कपाशी आणि सोयाबीन पिकांवर अळ्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून उंटअळी व पाने खाणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. लवकर पेरणी झालेले कपाशी पीक फुलोरा अवस्थेत असून उशिरा पेरणी झालेले पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. सेलू तालुक्यात १० टक्के पिकांवर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव असून देवळीतही हीच स्थिती आहे.कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी करीत असले तरी पावसाच्या अभावामुळे पिकांच्या स्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा नसल्याचे शेतकरी सांगतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाकडून प्राप्त बोंड अळी नियंत्रणाचे संदेशही शेतकºयांना दिले आहेत. यानुसार शेतकरी फवारणी करीत आहे.व्हायरसचाही अटॅकसोयाबीन पिकावर देवळी तालुक्यातील काही भागात व्हायरसचा अटॅक आहे. अत्यल्प पाऊस व अळ्यांच्या आक्रमणामुळे हातचे जाण्याची शक्यता असलेले पीक आता व्हायरसच्या अटॅकमुळे उत्पादन देणार की नाही, ही शंकाच आहे. बचावाकरिता कृषी विभाग उपाययोजना सूचवित आहे; पण पीक वाचविता येणार की नाही, ही धास्ती आहे. दोन्ही पिकांवर विविध रोग व अळ्या असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.सिंचनाला धोकाप्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा न झाल्याने रबी हंगामातील पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. धाम प्रकल्पात पाणी असल्याने पिण्याचे पाणी मिळणार असले तरी सिंचन धोक्यात येणे अटळ मानले जात आहे.
कपाशी, सोयाबीनवर अळ्यांचा प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 11:59 PM
हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पावसाचे भाकित केले होते; पण विदर्भासाठी ते फोल ठरले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ ६५ टक्के पाऊस झाला असून २५ टक्के तूट आहे.
ठळक मुद्दे२५ टक्के पावसाची तूट : रबी हंगामाला पाणी मिळणे कठीण, जलसंकट अटळ