महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजूर राज्यात अडकले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडून त्यांची घरवापसी केली जात असली तरी सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ३ हजारांच्यावर परप्रांतीय मजूर ४२ निवारागृहांमध्ये आपला मुक्काम ठोकून आहेत. या मजुरांना आपल्या घराची ओढ लागली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने योग्य पाऊल उचलून त्यांची घरवापसी करावी अशी मागणी या मजुरांची आहे.देशात कोरोनाचा शिरकाव होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन लॉकडाऊन जाहीर केले. शिवाय परप्रांतीय मजुरांना जेथे आहात तेथेच थांबण्याचे आवाहन केले. सध्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी केली जात आहे. इतकेच नव्हे तर केंद्र सरकारकडून मजुरांच्या घरवापसीसाठी विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. परंतु, वर्धा सारख्या छोट्या जिल्ह्यात अजूनही ३ हजार ११२ परप्रांतीय व इतर जिल्ह्यातील मजूर अडकून असल्याचे वास्तव आहे. या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था ४२ निवारागृहांमध्ये करण्यात आली असली तरी त्यांना आपल्या घराची ओढ लागली आहे. सदर मजुरांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असून वरिष्ठांच्या सूचनांची सध्या प्रतीक्षा आहे.५ हजार ७१ मजुरांना पाठविले स्वगावीलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिलला वर्धा जिल्ह्यात एकूण ८ हजार १८३ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर असल्याची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या मजुरांची राहण्याची व जेवनाची व्यवस्था ६१ निवारागृहात करण्यात आली होती. सदर निवारागृहांपैकी १३ शासकीय तर ४१ निवारागृह सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तयार करून त्यात मजुरांना ठेवण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या एकूण ८ हजार १८३ मजुरांपैकी ५ हजार ७१ मजुरांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात आले आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर १६ एप्रिल या दिवशी वर्धा जिल्ह्यात ८ हजार १८३ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर होते. त्यापैकी ५ हजार ७१ मजुरांना त्यांच्या स्वगावी रवाना करण्यात आले आहे. तर सध्या स्थितीत केवळ ३ हजार ११२ परप्रांतीय व जिल्ह्याबाहेरील मजूर वर्धा जिल्ह्यात आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था ४२ निवारागृहांमध्ये करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात असलेल्या मजुरांना लवकरच त्यांच्या मुळगावी पाठविण्यात येईल.- प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी वर्धा.