वर्धा : अनेक अडचणी आल्या, हातात पैसाही नव्हता, अशाही स्थितीत ते डगमगले नाही. आत्महत्येचा विचारही कधी मनाला शिवू दिला नाही. अशातही शासकीय मदतीवर निर्भय न राहता एका शेतकऱ्याने केवळ जिद्दीने शेती फुलविली. ही शेती अन्य शेतकऱ्यांच्या मनात नवा अंकूर फुलविणारी आहे.उत्तम झाडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वर्धा तालुक्यातील वाठोडा शिवारात त्यांची १५ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना दोन भाऊ आहे. मधला किसराज इंजिनिअर आहे. लहान्याचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. कापूस आणि सोयाबीन हेच त्यांचे मुख्य पीक. शेती पिकत नव्हती. शेती परवडेनासी झाली. बियाणे व रासायनिक खतांचा खर्चही झेपत नव्हता. अनेक अविचार डोक्यात आले. मात्र आत्महत्या करायची नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला. दोन्ही भावंडांनीही नोकरीच्या मागे न धावता शेतात राबण्याचा निर्णय घेतला. या तिघांही पारंपरिक पद्धतीला फाटा देण्याचा निर्णय घेतला. मागील तीन वर्षांपासून त्यांनी कपाशीचे पीक घेणे बंद केले. सोयाबीनचे पीक नगदी असल्यामुळे ते अजूनही घेत आहे. त्याशिवाय तूर, भाजीपाला, मिरची, वांगे, गहू व इतरही पीक घ्यायला सुरूवात केली. शेतात रासायनिक खतांचा वापरही कायम बंद केला. सोयाबीनचे पीकसुद्धा ते शेणखत टाकून घेतात. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबांचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. शेतात हे तिघे भावंडे तर राबतातच, शिवाय त्यांच्या बायकाही त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेती व्यवसाय करण्यासाठी मदत करीत आहे. दररोज भाजीपाल्याच्या बळावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, तर इतर पीक वार्षिक उत्पन्नात भर घालत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
बिकट परिस्थितीवर मात करून ‘त्यांनी’ फुलविली शेती
By admin | Published: December 31, 2014 11:29 PM