लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दुपारपर्यंत सुरूच होता. यात सकाळपर्यंत जिल्ह्यात ५५.५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात कारंजा आणि सेलू तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाचा जोर सकाळपासून कायम असताना समुद्रपूर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले. येथे दुपारपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत सुरू असलेल्या पावसात शेतकऱ्यांकडून पेरणीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे नुकसानीचा सामना करावा लागला आहे. समुद्रपूर तालुक्यात काही घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. तर अल्लीपूर येथे घराची भिंत पडल्याने बैलबंडीचे नुकसान झाले आहे. गत आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी दुपारपासून जिल्ह्यात हजेरी लावली. जिल्ह्यात पाऊसधारा कोसळताच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. मधल्या काळात पावसाने दडी मारल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. या पावसाने शेतात असलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. पावसाच्या दडीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यांनी पाऊस येताच पेरणीच्या कामांना प्रारंभ केल्याचे जिल्ह्यात दिसून आले. समुद्रपूर तालुक्यात ५१ घरांचे अंशत: नुकसान समुद्रपूर तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला. यात दुपारपर्यंत तालुक्यात १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील काही ५१ घरांचे अंशत: नुकसान झाले. याचा फटका एकूण १६९ व्यक्तींना बसला असून तसा अहवाल तहसीलदारांनी तयार केला आहे.
सेलू, समुद्रपूर व कारंजात अतिवृष्टी
By admin | Published: June 28, 2017 12:49 AM