लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने आता पवनार या गावालाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न करीत मोठ्या प्रमाणात तोडफोड करुन धुडगूस घातला. चोरट्यांच्या हातात फारसे काही लागले नसले तरी एकाच दिवशी पाच ठिकाणी झालेल्या चोरीच्या प्रयत्नामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.चोरट्यांनी शांत वस्तीतील कुलूपबंद घर किंवा इमारतींना चोरट्यानी टार्गेट केले आहे. अशाच ठिकाणी रविवारच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. प्रारंभी येथील बाबुराव बांगडे विद्यालयात शिरुन चोरट्यांनी विद्यालयातील कपाटाची मोडतोड केली. तसेच वर्ग खोलीतील पंखेही वाकवून ठेवले आहे. येथून काही चोरीला गेले नसले तरी चोरट्यांनी २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच नंदीखेडा परिसरातील विठ्ठल-रुख्मिनी देवस्थानच्या दानपेटी फोडण्याचा सुध्दा प्रयत्न केला. परंतु, दानपेटी उघडता आली नाही. त्याच ठिकाणी पर्यटनाची कामे सुरू आहेत. तेथील कंत्राटदाराच्या गोदामाचेही चोरट्यांनी कुलूप तोडले.त्या ठिकाणी कंत्राटदारापैकी कुणी नसल्याने नेमके काय चोरी गेले याचा अंदाज लागला नाही. त्याच परिसरात सुरेश पाटील यांची पानटपरी असून त्यांच्या पानटपरीतील सर्व सिगारेट व डब्यातील रोख असा एकूण दहा हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. बसस्थानक परिसरातील सुभाष वैद्य यांचीही पानटपरी फोडून चारशे तर पाचशे रुपयाची चिल्लर लंपास केली. सरपंच अजय गांडोळे यांच्या मालकीच्या इमारतीचे खालच्या माळाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर सेवाग्राम पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठून ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाणोत, सुधीर रडके यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. चोरीचे सत्र दिवसेदिवस वाढतच असल्याने पोलिसांनी चोरट्यांच्या तत्काळ मुसक्या आवळण्याची गरज आहे.यापूर्वीही शाळेत झाली चोरीमहामार्गावर असलेल्या पवनार या गावात चोरट्याची नेहमीच वक्रदृष्टी राहीली आहे. यापूर्वीही प्राथमिक मुलांच्या शाळेची खिडकी तोडून एलसीडी पळविण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच बाबुराव बांगडे विद्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले सिसिटिव्ही चोरट्यांनी यापूर्वीच चोरट्यांनी चोरुन नेले आहे. आता या शाळेतील साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.शाळेत बरेचदा चोरीचे प्रयत्न होत असून स्थानिकाच्या मदतीने हा प्रकार होत असावा, असा माझा संशय आहे. या आधी सुध्दा सिसिटीव्हीची चोरी झालेली आहे. शाळेला सुरक्षा रक्षकाचे पद नसल्याने रात्र पाळीत कुणीही राहात नाही. याचाच फायदा घेत शनिवारी रात्रीही चोरट्यांनी नुकसान केले.- श्रीकांत बांगडे, अध्यक्ष, बांगडे विद्यालय, पवनार.
पवनारात रात्रभर चोरट्यांनी घातला धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:43 PM
चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याने आता पवनार या गावालाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न करीत मोठ्या प्रमाणात तोडफोड करुन धुडगूस घातला. चोरट्यांच्या हातात फारसे काही लागले नसले तरी एकाच दिवशी पाच ठिकाणी झालेल्या चोरीच्या प्रयत्नामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देएकाच रात्री पाच ठिकाणी चोरी : शाळेतील साहित्याची केली तोडफोड