लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने तसेच जिल्ह्यातील अनेक व्यक्ती गाफिल असल्यागत वागत असल्याने सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. अशातच ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या मागणीत वाढही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, रेमडेसिविर तसेच कोविड व्हॅक्सिनबाबतची माहिती जाणून घेतली असता कोविडची प्रतिबंधात्मक लस वेटिंगवर तर ऑक्सिजन तसेच रेमडेसिविरचा मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले.भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सेवाग्राम तसेच सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन साठवणूक क्षमता वाढविण्यात आली आहे. तर रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण होऊ नये तसेच त्याचा पुरवठा नियमित होत रहावा, यासाठी विशिष्ट यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्याच्या मागणीच्या तुलनेत या दोन्ही बाबींसह कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पाहिजे तितका पुरवठा होत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या तिन्हीविषयी वेळोवेळी आढावा बैठक घेत वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत लस, ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाचे लिक्विड ऑक्सिजन आणि रेमडेसिविर औषधाचा होत असलेल्या पुरवठ्याकडे बारकाईने लक्ष असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगतले.
वेळीच उपलब्ध करून दिले जातेय लिव्हिड ऑक्सिजनसेवाग्राम येथील रुग्णालयात सुमारे २० मेट्रीक टन, सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात १० मेट्रीक टन तर आदित्य एअर प्रोडक्ट देवळी येथे १६ मेट्रीक टन लिव्हिड ऑक्सिजन साठवणूक करण्याची व्यवस्था आहे. गुरुवार, १५ एप्रिलला आदित्य एअर प्रोडक्ट देवळी येथे ७ मेट्रीक टन लिव्हिड ऑक्सिजन होते. तसेच दोन्ही काेविड रुग्णालयातही मुबलक ऑक्सिजन साठा होता असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे रुग्णालयांकडून मागणी नोंदविताच जिल्हा प्रशासनाकडून वेळीच कार्यवाही करीत ऑक्सिजन साठा उपलब्ध करून दिल्या जात आहे.
जिल्ह्यात १,२७२ रेमडेसिविर इंजेक्शनजिल्ह्यातील दोन अधिकृत विक्रेत्यांना रेमडेसिविरची साठवणूक करण्याची परवानगी आहे. त्यांच्याकडे सध्या ७४ रेमडेसिविर इजेक्शन असून मागणी होताच हे अधिकृत विक्रेते केवळ कोविड रुग्णालयांनाच त्याचा पुरवठा करू शकतात. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात ७२७, सेवाग्राम रुग्णालयात २०२ आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात २६९ रेमडेसिविर इजेक्शन असल्याचे सांगण्यात आले. वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत रेमडेसिविर इजेक्शनचा काळा बाजार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे. शिवाय अधिकृत विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे.
व्हॅक्सिन तुटवड्यामुळे २५ केंद्र पडली बंदमुबलक लससाठा असताना आरोग्य विभागाने हळूहळू जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत ती ८४ पर्यंत आणली. परंतु, जिल्ह्यात तयार झालेल्या लस तुटवड्यामुळे सद्यस्थितीत तब्बल २५ लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला काेविशिल्डचे १ लाख ५८ हजार २० तर कोव्हॅक्सिनचे २० हजार ७६० डोज प्राप्त झाले. गुरुवारपर्यंत १,४३,४४७ व्यक्तींना लसीचा पहिला तर १९ हजार ३९९ व्यक्तींना लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाने काेविशिल्डची २ लाख तर कोव्हॅक्सिनच्या ४ हजार डोसची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.
जिल्ह्याची मागणी लक्षात घेता वेळोवेळी मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तर सध्या मुबलक प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन आहे. तर मागणी करण्यात आलेली लस वेळीच उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.