शहीद घोषित करण्याकडेही कानाडोळा : निवृत्ती वेतनाअभावी कुटुंबांची आबाळ लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : स्थानिक केंद्रीय दारूगोळा भांडारातील दारूगोळ्याच्या प्रचंड साठ्यावर वसलेले हे पुलगाव शहर दिवस-रात्र जीव मुळीत घेऊन मागील सात दशकांपासून दहशतीत जगत आहे. मागील काही वर्षांत घडलेल्या बॉम्बस्फोट व आगीच्या घटनांनी केंद्रीय दारूगोळा भांडारात जीवित हानी फार झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे; पण ३१ मे २०१६ ची काळरात्र शहरवासी कधीच विसरू शकत नाही. या अग्निस्फोटात १९ जवान शहीद झाले तर १८ जवान गंभीर जखमी झाले होते. स्फोटामुळे परिसरातील पाच गावे प्रभावित झाली असून सर्वेक्षणामध्ये ११४ रुग्णांच्या स्मृतीवर परिणाम झाल्याची बाब पूढे आली. पाहता -पाहता एक वर्षाचा कालावधी निघून गेला. घटनेनंतर काही दिवस शासकीय प्रशासन, नेते, प्रणेते यांची वारी झाली. आवश्वासनाच्या खैराती वाटल्या; पण अग्निस्फोटातील शहीद परिवाराच्या वेदना मात्र आजही कायम आहेत. शहरातील शहीद बाळू पाखरे, लिलाधर चोपडे, अमित दांडेकर, प्रमोद मेश्राम व अमोल येसनकर या परिवारातील कमवता माणूस शहीद झाल्यानंतर त्या परिवाराकडे केंद्र व राज्य प्रशासनाकडून एक वर्षाच्या कालावधीत लक्ष देण्यात आले नाही. मदत तर सोडाच साधी विचारणाही झाली नसल्याची व्यथा परिवाराकडून कथन केली जाते. घटनेनंतर शहीद कुटुंबियांचे सांत्वन करताना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शहीद कुटुंबियांच्या नातेवाईकांना अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी मिळावी म्हणून मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षणमंत्री यांना पत्र पाठवून स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. इतकेच नव्हे तर शहीद कुटुंबियांच्या सर्व परिवाराच्या समस्या लिहून घेवून व वर्धा येथे येताच या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही दिली होती. घटनेनंतर पालकमंत्री वर्धा येथे अनेकदा येऊन गेलेत; पण त्यांना या शहीद कुटुंबियांना दिलेल्या शब्दाचा विसर पडल्याची खंत शहीद कुटुंबियांनी व्यक्त केली. हिंदुस्थान कॉलनीस्थित शहीद बाळू पाखरे यांच्या घरी भेट दिली असता वीरपत्नी जिजाबाई बेरोजगार मुलगा, म्हातारी आई, दोन नातू भावासह ६ जणांचा परिवार आहे. जिजाबाई उदास व चिंतीत मुद्रेने आपली व कुटुंबाची व्यथा सांगत होत्या. कमविता एकुलता माणूस गेल्याचे दु:ख उरात दडवून कुटुंबाचा सांभाळ करणे कठीण आहे. घरात नोकरीच्या शोधात असणारा सुशिक्षित बेरोजगार मुलगा, म्हाताऱ्या सासूसह ६ व्यक्तीच्या पालन-पोषणाची जबाबदारी कशीबशी सांभाळत असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेपासून नोकरीत मिळणारी ग्रज्युएटी सोडली तर वर्षभरात शासनाकडून कुठलीही मदत नाही. साधे सेवानिवृत्ती वेतनही सुरू करण्यात आले नाही. अनुकंपा तत्वावर नोकरीही देण्यात आली नाही. कुण्या अधिकाऱ्यांनी एक वर्षात साधी विचारणाही केली नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शहिदांच्या कुटुंबीयाची अशीच आबाळ होत असून कुणालाही वर्षभरात निवृत्तीवेतनाचा लाभ मिळालेला नाही. ३१ मे २०१६ च्या अग्निस्फोटात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिक अधिकाऱ्यांना शहीद घोषित करून त्यांना सर्व योजनेचा लाभ दिला जातो; पण त्याच घटनेत वीरमरण प्राप्त झालेले असताना अद्याप शासनाने त्यांना शहीदही घोषित केले नाही. असा भेद भाव काय, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
शहीद कुटुंबाच्या व्यथा, वेदना कायमच
By admin | Published: May 31, 2017 12:54 AM