वर्धा : सलग २४ तास जीवशास्त्र अध्यापनाचा विश्वविक्रम विज्ञान शिक्षिका पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी केला आहे. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ आणि सेल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंगी येथील विद्यापीठ सभागृहात हा आगळावेगळा विक्रम नोंदविला गेला.
गत दहा वर्षांपासून पल्लवी सूरज बोदिले या जीवशास्त्र हा विषय शिकवतात. या विक्रमाकरिता त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डससाठी पूर्वनोंदणी केली होती. त्यानुसार, गुरुवारी पहाटे ५.४० वाजता त्यांनी दत्ता मेघे सभागृहात जीवशास्त्र या विषयाचे विविध धडे पूरक आकृत्यांच्या मांडणीसह शिकविणे सुरू केले. या कालावधीत त्यांनी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जीवशास्त्र तसेच शरीरविज्ञान शास्त्राच्या तासिका घेतल्या. तर, सायंकालीन सत्रात त्यांचे वयात येणाऱ्या मुला-मुलींबाबत पालकांकरिता स्वतंत्र व्याख्यानही झाले.
विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाने वाढविला उत्साह
प्रत्येक दोन व्याख्यानांच्या दरम्यान १० मिनिटांची विश्रांती घेण्याची अधिकृत सवलत असताना त्याचाही फारसा वापर न करता पल्लवी बोदिले यांनी पूर्वघोषित १८ तासांचा विक्रम रात्री पूर्ण केला. मात्र विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत असल्याने आपला उत्साह कायम ठेवत पल्लवी बोदिले यांनी विज्ञान विषयाची मांडणी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरूच ठेवली.अन् परीक्षकांनी रीतसर केली घोषणा
या २४ तासांच्या सलग व्याख्यानात आवाजाचा स्तर आणि देहबोलीवर नियंत्रण ठेवत तसेच कोठेही न अडखळता व चुकीचा शब्दोच्चार येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेत हे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता या बायोलॉजी लेक्चर मॅराथॉनच्या विश्वविक्रमाची रीतसर घोषणा आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे नियुक्त परीक्षक डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी केली. शिवाय पल्लवी बोदिले यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र पदक व सन्मानचिन्हासह प्रदान करण्यात आले.यांचे लाभले सहकार्य
या आयोजनात सेल अकॅडमीचे संचालक सूरज बोदिले, दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठातील अलाईड हेल्थ सायन्सेसचे संचालक डॉ. अभ्युदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, डॉ. सुधाकर शिंदे, बेन्नी सॅम्युअल, रितुराज चुडीवाले, पिंपळकर, स्वप्निल चरभे, अभिजित वानखेडे, अफसर पठाण, पुरुषोत्तम वाघमारे, कार्तिक व गौरव पाटोदकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमातील विविध सत्रात कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय, सेल अकॅडमी तसेच विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.