गावात खळबळ : अटकेची मागणीलोकमत न्यूज नेटवर्क घोराड : तळोदी येथील ग्रामसेवक विनोद करपाते यांना गावातील दोघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे गावात चांगलीव खळबळ माजली आहे. या प्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सुत्रानुसार, ग्रामसेवक करपाते शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी वनविभागाच्या रोपवाटीकेतून ३५० वृक्ष ग्रामपंचायत कार्यालयात घेवून आले. हे वृक्ष अंगणवाडी जवळ उतरविण्याचे सांगत असताना गावातील चंद्रभान नत्थू धाबर्डे यांनी ग्रामसेवकाला दलीत वस्ती अंतर्गत व नाली बांधकामाविषयी विचारणा केली. ग्रामसेवक करपाते यांनी सदर कामाची माहिती सांगितली; पण धाबर्डे यांनी ग्रामसेवकाच्या गालावर थापड मारुन शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने वेळूची काठी घेवून पुन्हा ग्रामसेवकाला मारण्याचा प्रयत्न केला. त्याला सुनील भगत याने साथ दिली व दोघांनीही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.ग्रामसेवकाने आपला जीव मुठीत घेवून रात्री सेलू पोलीस ठाणे गाठून त्या दोघाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन चंद्रभान धाबर्डे व सुनील भगत या दोघांविरोधात भादंविच्या कलम ३५३, ५०४, ५०६, ३४, १८६ आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला.ग्रामसेवकाला झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपीला अटक करावी अशी मागणी होत आहे. सेलू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एस.एम. कोल्हे यांनी आरोपीला अटक करावी म्हणून वरिष्ठांना पत्रव्यवहार केला आहे.
तळोदीच्या ग्रामसेवकाला मारहाण
By admin | Published: July 03, 2017 1:48 AM