लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मागील अनेक वर्षांपासून आदर्शनगर येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असून, अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. सध्या या परिसरात पाणीबाणी सुरू असून, रहिवाशांना चार दिवसांआड पाणी मिळत असल्याने अनेकांना दुचाकी, चारचाकी, सायकलवरून पाणी भरण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. आदर्श नगरात नव्या घरांची भर पडत असल्याने घरांची संख्याही ६०० वर गेली आहे.
या परिसराची लोकसंख्या १८०० वर आहे. रहिवाशांना ग्रा.पं.च्या विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी जलकुंभ असून, त्यात पाणी साठवून ठेवले जाते. पाणी समस्या लक्षात घेता चार पाॅइंटवरून पाणी सोडण्यात येते. यात एका पाॅइंटसाठी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे चार दिवसांनंतरच पाणी मिळते. परिसरात तीन हँडपंप असून, त्या ठिकाणी सकाळी व सायंकाळी पाणी भरण्यासाठी रांगा लागतात. विशेष म्हणजे जुन्या कार्यकारिणीने जुन्या वस्तीतील विहिरीवरून पाइपलाइन टाकून आदर्शनगराच्या विहिरीत पाणी सोडण्याचा प्रयोग केला होता; पण तो प्रयोगही फोल ठरला. मात्र, आता पुन्हा ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
परिसरात पाणी समस्या आहे. ताकसांडे लेआऊटमधील विहिरीवरून पाणी घेण्यात येणार असल्याने समस्येवर काही प्रमाणावर तोडगा निघेल. ग्रा.पं.कडून प्रयत्न सुरू आहेत.
सुजाता ताकसांडे, सरपंच सेवाग्राम, ग्रा.पं.
ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी समस्या सुटत नाही. दरवर्षीची समस्या असल्याने तोडगा का काढला जात नाही, हे मात्र कळत नाही. भर उन्हाळ्यात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रोशन तेलंग, सामाजिक कार्यकर्ता.
पाण्याची बिकट समस्या आहे. म्हाडा कॉलनीतील हँडपंपवरून पाणी आणतो. मागील वर्षी वरूड रे. परिसरातील व्हाॅल्व्हवरून पाणी भरले. ग्रा.पं.ने तात्काळ उपाययोजना करून दिलासा द्यावा.
दिलीप शेंद्रे, नागरिक. आदर्शनगर.