लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील पार्किंगचा प्रश्न सुटावा, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून वाहतूक नियंत्रक विभाग दररोज विविध नियमांद्वारे कारवाई करीत आहे. पार्किंगसाठी जागांचा शोध घेत तत्सम फलक लावत आहे; पण अतिक्रमणामुळे त्यांना यश येताना दिसत नाही. रेल्वे स्थानक मार्गावरही पार्किंगसाठी फलक लावले; पण पालिकेने अतिक्रमणच हटविले नाही. यामुळे पार्किंग वाहनांची की बंड्यांची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्धा शहरात वाहनांची पार्किंग करण्याकरिता जागा नाही. यामुळे नागरिक रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करतात. परिणामी, रहदारीला अडथळा निर्माण होत असून वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेद्वारे पार्किंगसाठी जागा शोधली जात आहे. पालिका प्रशासनाशी बोलून तेथे फलक लावले जात आहे. या प्रयत्नांतून अनेक ठिकाणी पार्किंगची सुविधाही झाली आहे; पण बजाज चौकातील पार्किंगचा तिढा सुटत नसल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाशी बोलून वाहतूक पोलिसांनी भाजी बाजाराच्या रेल्वे स्थानकाकडे जाणाºया मार्गाच्या एका बाजूला पार्किंगचे फलक लावले. यासाठी त्या मार्गावरील फळ तथा भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे होते; पण सूचना दिल्यानंतरही नगर पालिका प्रशासन अतिक्रमण हटविण्यात पुढाकार घेत नसल्याने पार्किंगची सुविधा होऊ शकत नसल्याचेच दिसून येत आहे. पार्किंगचे फलक लावलेल्या ठिकाणी फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागल्या आहेत. यामुळे ग्राहकांनी वाहने कुठे ठेवावीत, हा प्रश्न कायम आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. पालिका प्रशासनाने ते हटविणे गरजेचे झाले आहे.फळ विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करण्याकडेही दुर्लक्षनगर पालिका प्रशासनाने बजाज चौक, भाजी बाजार व रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमण अनेकवेळा हटविले; पण तेथील फळ विक्रेते, चहा कॅन्टीनधारक व अन्य किरकोळ व्यावसायिकांना पर्यायी जागा दिलेली नाही. परिणामी, ते वारंवार त्याच ठिकाणी आपली दुकाने लावतात. यापूर्वी अनेकदा पालिका प्रशासन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजी बाजाराची पाहणी केली. विकासाचा प्लानही तयार केला; पण तो प्रत्यक्षात साकारलाच जात नसल्याने फळ विक्रेत्यांनी तरी पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय कुठे करावा, असा प्रश्न उपस्थित होतो. याचा विचार करीत तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.शहरात पार्किंगची सुविधा देण्याच्या दृष्टीने जागांचा शोध घेतला जात आहे. सध्या रेल्वेस्थानक परिसर तथा त्याच मार्गावर भाजी बाजाराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला नगर पालिकेची बोलणी झाल्यानंतर फलक लावले आहेत; पण तेथील अतिक्रमण पालिकेने हटविले नाही. आम्ही दररोज त्या विके्रत्यांना अन्यत्र व्यवसाय करण्यास सांगतो; पण ते ऐकत नाहीत. पालिकेने व्यावसायिकांना पर्यायी जागा देत पार्किंग व वाहतूक सुधारण्यात सहकार्य करणे गरजेचे आहे.- दत्तात्रय गुरव, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रक शाखा, वर्धा.
पार्किंग, वाहनांची की बंड्यांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 10:22 PM
शहरातील पार्किंगचा प्रश्न सुटावा, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी म्हणून वाहतूक नियंत्रक विभाग दररोज विविध नियमांद्वारे कारवाई करीत आहे.
ठळक मुद्देरेल्वेस्थानक मार्गावरील प्रकार : वाहने ठेवायची कुठे, प्रश्न कायम