नायलॉन मांजावर बंदी : आढळल्यास कठोर कार्यवाही, पक्षीमित्र संघटनांचा पुढाकार वर्धा : मकरसंक्रांतीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्याचा खेळ राज्यात रंगतो. यावेळी प्लास्टिक वा कृत्रिम वस्तुंचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाच्या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यामुळे पक्षी, प्राणी व मानव जीवितास इजा पोहोचते. काही प्रसंगी हा मांजा प्राणघातक ठरतो. या मांजावर न्यायालयाने बंदी घातली आहे. याची योग्य अंमलबजावणी करीत पक्ष्यांच्या जीवावर बेतणाऱ्या या धाग्याला हद्दपार करण्याची गरज आहे. पतंग उडविण्याच्या या धाग्यामुळे होणाऱ्या प्राणघातक जखमांपासून पक्षी व मानवांना संरक्षण मिळणे गरजेचे आहे. पतंगांसह तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्याचे तुकडे जमिनीवर पडतात. सदर तुकड्यांचे लवकर विघटन होत नसल्याने गटारे व नदी -नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. गाय वा सत्सन प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यास त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. मांजातील प्लास्टिक वस्तुमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. नायलॉन मांजाच्या अतिवापरामुळे विजेच्या तारावरील घर्षण होऊन ठिणग्यांनी आगी लागतात. परिणामी, वीजप्रवाह खंडित होऊन विजकेंद्रे बंद पडतात. यात विद्युत उपकरणांना बाधा पोहोचते. अपघात होतात. वन्यजीवांना धोका होतो. जीवितहाणीची शक्यता असते. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात कुठेही नायलॉन मांजाचा वापर होताना दिसल्यास वा कुणीही विक्री करताना दिसल्यास पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ अन्वये पोलीस यंत्रणा, वन विभाग व पिपल फॉर अॅनिमल्सद्वारे संयुक्त कार्यवाही शक्य आहे.(कार्यालय प्रतिनिधी) मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा ४आर्वी : उच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या नायलॉनच्या मांजाची (धाग्याची) शहरात खुल्या प्रमाणात सुरू असलेली खरेदी व विक्री थांबवावी. नायलॉनच्या मांजाची खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी पर्यावरण बचाव समितीद्वारे करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले. मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा केला जातो.
पतंगीचा खेळ बेतणार पक्ष्यांच्या जीवावर
By admin | Published: January 14, 2017 1:39 AM