पंकज भोयर : ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रमाला प्रारंभ लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ग्लोबल वार्मिंग, ऋतुचक्र परिवर्तन व नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्या उद्देशाने शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. यावर्षी ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून जिल्ह्यातील नागरिकांनी रोप लागवडीत मोठ्या संख्येने सहभागी होवून स्वच्छ वर्धा हरीत वर्धा करण्याचे आवाहन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले. वृक्ष लागवड वाढविण्यासाठी वनमहोत्सव केंद्राच्या माध्यमातून ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते आर्वी नाका चौकातून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, पिपल फॉर अॅनिमल्सचे आशिष गोस्वामी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. भोयर म्हणाले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पे्ररणेतून वृक्षलागवडीचा ऐतिहासिक उपक्रम राज्यात होत आहे. मागील वर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक रोपे लागवड केली. यावर्षी ४ कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट असून आतापर्यंत ५ कोटी २० लक्ष खड्डे खोदून नोंदणी झाली आहे. वर्धा वन विभागातर्फे यावर्षी ५ लाख ६८ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट असून सामाजिक वनीकरण १ लक्ष २२ हजार रोपे, ग्रामपंचायत ५० हजार रोपे, स्वयंसेवी संस्था ३९ हजार व इतर शासकीय कार्यालये आणि शाळा महाविद्यालये व सहभागातून ३ लक्ष ६० हजार रोपे संपूर्ण जिल्ह्यात लागवड करण्याचा मानस आहे. या सामाजिक कार्यक्रमाचा भाग म्हणून वर्धा वनपरिक्षेत्र तसेच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण सहा ठिकाणी वनमहोत्सव केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. सदर केंद्राद्वारे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या शासकीय रोपवाटीकेमध्ये तयार केलेली रोपे सवलतीच्या दरात शहरी भागातील नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. यामध्ये नेमण्यात आलेल्या वृक्षमित्रांतर्फे नागरिकांना लागवड योग्य रोपे त्यांना घरपोच मिळणार आहे. प्रास्ताविक उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी केले. दि. २५ ते ३० जून या कालावधीत रोपे आपल्या दारी उपक्रमात जिल्ह्यात विविध केंद्र उभारण्यात आले असून ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
वृक्ष लागवडीत सहभाग घ्या
By admin | Published: June 29, 2017 12:44 AM