वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून व त्यापूर्वीही शरद पवार, अजित पवार यांच्याशी स्नेहबंध सांभाळून ठेवणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांची राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोची झाली आहे. विदर्भात दादा व साहेब यांचे संबंध सांभाळून कुण्या एकाकडे आपली राजकीय शक्ती ठेवताना नेत्यांची धडपड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर सामान्य कार्यकर्ते या घटनेने हादरले आहेत. ज्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून काम केले त्यांचा स्नेहसंबध साहेब व दादा या दोघांशीही आहे. आता फुटीनंतर दोन्ही गट या नेत्यांशी संपर्क करत आहे. मात्र, राजकीय भूमिका काहीतरी घ्यावी लागणार असल्याने काहींंनी साहेबांना पसंती दिली आहे, तर काही दादांकडे गेले आहेत. या साऱ्या प्रकारात आपले वैयक्तिक संबंध दोघांशीही अबाधित राहिले पाहिजे म्हणून दादा-साहेबांना भेटून आपली होत असलेली गोची सांगण्याचे काम काही नेतेमंडळी करीत आहेत.
काँग्रेस पक्षातून बाहेर पडून १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. विदर्भात काँग्रेसची ताकत मोठी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस येथे फार पाळेमुळे मजबूत करू शकली नाही. मात्र. प्रत्येक जिल्ह्यातील संस्थानिक नेते या पक्षात दाखल झाले. विशेषत: सहकारामध्ये काम करणाऱ्या नेत्यांचा समावेश यात होता. आता पक्षाचे विभाजन झाल्याने कुणाकडे जावे, हा प्रश्न पडला आहे. दोघांकडूनही संपर्क केला जात आहे. अशावेळी नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत निश्चित तयारी नेतेमंडळी करीत आहे.
वर्धाचे ज्येष्ठ सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांनी शरदचंद्र पवार यांच्याकडेच राहण्याचा निर्णय घेतला. साहेबांशी गेल्या पंधरा वर्षांपासून संबंध आहेत., ते तोडणे शक्य नाही. त्यामुळे आपण दादांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचविणाऱ्यांना तशी माहिती दिली असल्याचे ’लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले. तर दोघांशीही आपले स्नेहसंबंध कायम ठेवून काही मुद्द्यांच्या आधारे (जसे की ओबीसींचे प्रश्न, ओबीसी विद्यार्थ्यांच्या अडचणी) आदींसाठी छगन भुजबळ काम करीत असल्याने आपण अजित पवारांकडे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, मोठ्या पवारांशीही आदराचे संबंध आजही कायम राहतील, असे महात्मा फुले समता परिषदेचे नेते प्रा. दिवाकर गमे यांनी सांगितले.
विदर्भात साहेबांचे पारडे जड
विदर्भात पश्चिम व पूर्व असे दोन भाग असले तरी भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांतही साहेबांचे अनेक हितचिंतक आहेत. ते आता संकटाच्या काळात साहेबांसोबत येत आहेत. तसेच पश्चिम विदर्भातही साहेबांना मानणारा मोठा वर्ग राजकीय व इतर असल्याने या परिस्थितीत तोही वर्ग साहेबांसोबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दादांपेक्षा साहेबांचे पारडे विदर्भात भारी राहण्याची शक्यता आहे.