रस्त्यावरील खोल खड्डे धोकादायक : गिट्टीमुळे वाहनचालकांना त्रास वर्धा : शहरातील गांधी पुतळ्यापासून सेवाग्राम उड्डाणपूलापर्यंतचा रस्ता वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याची डागडुजी करताना डांबराचे ‘पॅच’ लावले. यामुळे हा रस्ता उंचसखल झाला आहे. अनेकदा या रस्त्यावरून वाहने घसरतात. रस्त्याचे दुभाजकही तुटलेले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करून दुभाजकांची डागडुजी करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. या रस्त्याला काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे खोल असून अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्त्यावरील खड्डे दृष्टीस पडत नाही. परिणामी, वाहन खड्ड्यांमध्ये अडखळूून अपघातांना सामोरे जावे लागते. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. दिवसरात्र येथे वाहनांची ये-जा असते. पथदिवे असले तरी ते पुरेसा प्रकाश देत नाहीत. यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रस्त्याच्या कडेला गिट्टी पडून आहे. यावरून वाहने घसरून किरकोळ अपघात होतात. या मार्गावर शाळा, महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थी ये-जा करतात. शिवाय याच मार्गावर शासकीय कार्यालये असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनाही याच मार्गाने प्रवास करावा लागतो. कार्यालयीन कर्मचारी, मजूर वर्ग आणि सेवाग्राम रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. यामुळे या रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. हा रस्ता काही भागात उंचसखल असल्याने वाहन चालविणे कठीण होते. वाहन उसळत असल्याने वाहन चालक तसेच प्रवाशांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. रुग्णव्यक्ती असल्यास त्यांनाही यातनामय प्रवास करावा लागतो. येथून जडवाहने धावतात. यामुळे अल्पावधीत रस्त्याची दुरवस्था होते. या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करून दुभाजकांची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे.(स्थानिक प्रतिनिधी) व्हॉल्व्ह लिकेजमुळे खड्डा या मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ असलेला नळयोजनेचा व्हॉल्व्ह नेहमी लिक होतो. यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. व्हॉल्व्हमुळे येथे खड्डा तयार झाला असून रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसत नाही. अशातच वाहन चालकांना अपघात होतात. काही दिवसांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली; पण काम करताना दर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, अलपावधीत रस्त्याची चुरी बाहेर पडली आहे. या चुरीमुळे वाहनांचे टायर पंक्चर होतात. शिवाय ही बाब अपघाताला कारणीभूत ठरते.
सेवाग्राम रस्ता झाला ‘पॅच’मय
By admin | Published: March 05, 2017 12:37 AM