तत्काळ रस्ता दुरूस्तीची गरज : वाहनचालकांना ये-जा करताना करावी लागते तारेवरची कसरत लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरानजीकच्या नालवाडी भागातील न्यू स्टेट बँक कॉलनी मार्गाची दैनावस्था झाली आहे. परिणामी, या मार्गावरून ये-जा करताना वाहनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सदर मार्गावरील खड्डे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने या रस्त्याची ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दुरूस्ती करण्याची गरज आहे. वर्धा-नागपूर मार्गावरील नालवाडी भागातील न्यू स्टेट बँक कॉलनी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. वर्धा-नागपूर या मुख्य मार्गापासून भाविक यांच्या घरापर्यंतच्या काही रस्त्याचे गत काही वर्षांपूर्वी सिमेंटीकरण करण्यात आले. तर काही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, अल्पावधीतच सदर सिमेंट रस्त्यावर खड्डे पडल्याने तसेच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावरील गिट्टी उघडी पडल्याने कामाच्या गुणत्तेबाबत परिसरात उलट सुलट चर्चा होताना दिसते. या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोपही रहिवासी करतात. रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करून नियोजित ठिकाणी जावे लागत आहे. लोकप्रतिनिधींसह ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यासाठी दुर्लक्ष केल्या जात असल्याची परिसरात ओरड आहे. नागरिकांना रस्त्याच्या दैनावस्थेमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रा.पं. प्रशासनाने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्याची मागणी नागरिकांची आहे. मोठ्या अपघाताला निमंत्रण न्यू स्टेट बँक कॉलनी मार्गावरील खड्डे रात्रीच्या सुमारास सहज दिसत नाहीत. परिणामी, मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. जीव मुठीत घेऊन या मार्गाने वाहनचालकांना ये-जा करावी लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता तात्काळ रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्याची मागणी आहे. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक अपघात झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. अनेकांना रस्ता अपघातात प्राण गमवावे लागले असून बहुतांश नागरिकांना कायमचे अपंगत्त्व आले आहे.
न्यू स्टेट बँक कॉलनी मार्गावर खड्डेच खड्डे
By admin | Published: June 26, 2017 12:42 AM