सेलू: ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यामुळे सुरू असलेल्या सिंचन विहिरीचे देयक अडकले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासकीय कार्यालयातून योग्य उत्तर मिळत नसल्याने अडचणीत आले आहे. मनरेगा अंतर्गत सेलू येथील तीन शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर झाली २०१३ प्र.क.४० म.गा. च्या २ फेब्रुवारी १५ च्या पत्राप्रमाणे विहिरीच्या खोदकामास सुरूवात केली. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी विहिरीचे खोदकाम करण्यास सांगितले. पण अवघ्या काही दिवसानंतर सेलू ग्रामपंचायत ही नगर ग्रामपंचायत बनली आणि प्रशासक म्हणून तहसीलदारांच्या हाती कार्यभार आला. त्यामुळे ग्रामसचिवाचे पद रिक्त होऊन विहिरीच्या मजुरांचे मस्टर अडकले. येथील विनोद गोमासे, सुरेश कुकडे, कुंदा चोरे या शेतकऱ्यांनी खोदलेल्या विहिरीची देयके मिळावी म्हणून ग्रामपंचायत व पंचायत समिती ने चौकशी केली तेव्हा गटविकास अधिकारी यांनी तहसीलदारांकडे जाण्याचा सल्ला दिला. ग्रामपंचायतचा कारभार संपुष्टात येऊन नगर पंचायतचा कारभार सुरू झाल्याने या शेतकऱ्यांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. नगरपंचायतमध्ये केवळ प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्याधिकारी नसल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मष्टर काढून यांना सहकार्य करावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र दंढारे, विनोद गोमासे यांनी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)
सिंचन विहिरीचे देयक अडकले
By admin | Published: April 19, 2015 1:56 AM