जमाते ईस्लामी हिंदचे आयोजन : सर्वच धर्मांचा आदर करण्याची गरज केली व्यक्त वर्धा : जमाते इस्लामी हिंद वर्धातर्फे शांती व मानवता अभियान या विषयावर जनसभा घेण्यात आली. कार्यालयाच्या अध्यक्षस्थानी मो. अजहरूद्दीन तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेश खैरनार, डॉ. अन्वर सिद्दीकी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात कुरान पठनाने झाली. काझी हकीम उद्दीन यांनी त्याचा मराठीत अनुवाद प्रस्तुत केला. यावेळी मठकर म्हणाले, सध्या देशात विचित्र स्थिती आहे. गत काही वर्षात ही स्थिती बिघडलेली आहे. अहिंसेच्या मार्गाने जगात अनेक देश स्वतंत्र झाले. आपण कोणत्या मार्गाने जायला हवे हिंसेच्या की अहिंसेच्या याचा विचार व्हायला हवा. डॉ. खैरनार म्हणाले, आरएसएस ही संस्था देशातील वातावरण बिघडवत आहे. ईसीस देशात पाय पसरवत आहे. यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. सिद्दीकी म्हणाले, फुट पाडा व राज्य करा हा राजकारणाचा भाग आहे. यापासून साधव राहणे गरजेचे आहे. प्रात्येकाने दुसऱ्याच्या विचारांचा व धार्मिक श्रद्धेचा सन्मान करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय भाषणात मो. अजरूद्दीन म्हणाले, देशाला सुपर पावर बनविण्यासाठी २० टक्के अल्पसंख्याकाना सोबत घ्यावेच लागेल. धर्माचा उपयोग मानवाला जोडण्यासाठी व्हावा. मन की बात केली जात असली तरी मनं जोडली जाण आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी रोहित वेमुला याच्यावर आधारित स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक सद्भावनेसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बजाज व अमीर अली अजानी यांना सद्भावना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रास्ताविक मो. आरीफ शेख यांनी केले. शांती आणि मानवता अभियानात कोण कोणते कार्यक्रम राबविण्यात आले याची थोडक्यात माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जहीर मुजावर यांनी केले. आभार धनंजय सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाचा उद्देश व गरज याबाबतची माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा जिल्हा संयोजक सय्यद नियाज अली यांनी दिली. कार्यक्रमाला प्रामुख्याने अभ्युदय मेघे, किशोर जगताप, सलीम शेख, सल्लू भाई, श्रीराम जाधव, नूतन माळवी, गजेंद्र सुरकार, फजलूर रहेमान, काझी हकीमो उद्दीन माधुरी झाडे, शबनम सलीम शेख, गुंजनसिंह, अविनाश काकडे, प्रशांत गुजर, अर्शी मलिक, आदी उपस्थित होते. जेआयएस जिल्हाध्यक्ष गाझीया सुलताना, जावेद खान, प्रा. वसीम खान, प्रो. अनिल बेग, प्रो. बिस्मीला खॉन, अम्मारा खान, शिरीन शादाब शेख व मोहम्मद आरीफ शेख यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
‘शांती व मानवता अभियान’ जनसभेत ज्वलंत समस्यांवर चर्चा
By admin | Published: September 01, 2016 2:18 AM