बँकेच्या भीतीपोटी शेतकऱ्यांचा शेतमाल घरीच वर्धा : कॅशलेस व्यवहार करण्यावर शासनाचा भर आहे. त्याकरिता विविध कार्यशाळाही आयोजित करण्यात येत आहे. याच कॅशलेसच्या धरतीवर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे धनादेश आणि आरटीजीएस पद्धतीने देणे सुरू केले. शेतकऱ्यांकडून हे धनादेश बँकेत असलेल्या बचत खात्यात जमा होत असतानाच यातून त्यांच्या पीक कर्जाचे हप्ते कपात करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी करताना दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत भीती निर्माण झाल्याने शेतमाल घरीच असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. नोटबंदीचा निर्णय झाला त्या काळापासूनच सर्वत्र कॅशलेस व्यवहार सुरू झाला आहे. यात सारेच व्यवहार आॅनलाईन करण्यावर भर देण्यात आला. नोटबंदी जाहीर झाली तो काळ आणि पांढऱ्या सोन्याचा उत्पादक असलेल्या या भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन निघण्याची वेळ एकच आली. यामुळे बाजारात असलेल्या व्यापाऱ्यांनी त्यांचे व्यवहार धनादेश किंवा आरटीजीएस पद्धतीने करणे सुरू केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे चुकारे धनादेशाने मिळू लागले. ते धनादेश बँकेत त्यांच्या खात्यात जमा होताच बँक प्रशासनाने शेतकऱ्याकडे असलेल्या पीक कर्जाचे हप्ते कपात करण्याचा सपाटा सुरू केला. साधारणत: शेतमाल विकून पहिले हातउधारी फेडण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो; मात्र बँकेकडून झालेल्या या निर्णयामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. याची ओरड शेतकऱ्यांकडून होत असून याकडे बँक व्यवस्थापकाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. असे असताना बँक व्यवस्थापकांकडून केवळ चौकशी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात येत असून त्यांची लूट सुरूच आहे. जिल्ह्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या लुटीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी) शेतमाल विकूनही हात रिकामेच शेतकऱ्यांनी बाजारात आणून त्याचा शेतमाल विकला. शेतमाल विकल्यानंतर त्याच्या हाती रक्कम येईल, असे वाटले होते; मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. शेतमालाचा चुकारे धनादेशाच्या रूपाने मिळाले. ती रक्कम बँकेत जमा झाली आणि ती तिकडूनच गायब झाली. यामुळे शेतमाल विकूनही शेतकऱ्यांचे हात रिकामेच राहिल्याचा प्रकार त्याच्यासोबत घडल्याचे चित्र आहे. बँकांकडून होत असलेल्या कपातीच्या भीतीपोटी अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पादन बाजारात आणावे अथवा नाही, या विवंचनेत सापडले आहे. यामुळे त्यांचा शेतमाल त्यांच्याच घरी पडून असल्याचे चित्र आहे. सेलगाव (लवणे) येथील शेतकऱ्याचे कापले १६ हजार रुपये सेलगाव (लवणे) येथील शेतकरी मनोहर घागरे यांनी त्यांचा शेतमाल विकून चुकाऱ्याचा धनादेश बँकेत जमा केला. १५ दिवसांनी ते धनादेश वठला असेल, जमा झालेल्या रक्कमेची उचल करावी म्हणून ठाणेगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत गेले. येथे गेल्यावर त्यांच्या खात्यातील तब्बल १६ हजार रुपये बँकेने कापल्याचे समोर आले. यामुळे आता त्यांच्या खात्यात काहीच रक्कम नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रकरणासंदर्भात त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता चौकशी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे.
चुकाऱ्याच्या धनादेशातून पीक कर्जाची कपात
By admin | Published: January 05, 2017 12:32 AM