वर्धा : मान्सूनच्या आगमनाचा वेग गती घेताना दिसत नसतानाच राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना करायच्या कर्ज वाटपाचा वेगही मंदावल्याचेच दिसते. राष्ट्रीयकृत बँकांच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी करावयाच्या कर्ज वाटपाचा टक्का जेमतेम ३० पर्यंत वाढला असल्याचा अंदाज लीड बँकेने वर्तविला आहे.३१ मे रोजी कर्ज वाटपाचा टक्का २६ पर्यंत पोहोचला होता. यात चार टक्क्याने वाढ झाली असेल, अशी माहिती लीड बँकेतून देण्यात आली. रविवारी विभागीय आयुक्त जिल्ह्यातील कर्जवाटपाचा आढावा घेण्याकरिता नागपूर येथे बैठक घेणार आहे. १५ वा १६ जून रोजी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेणार आहे. यामुळे अद्यावत आकडेवारी लीड बँक उपलब्ध करणार आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी ३ जून रोजी बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्ह्यातील कर्ज वाटपाचा आढावा घेतला. यानंतर मात्र वेगाने कर्ज वाटप करीत ३० टक्के शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले. बुधवारी पावसाच्या सरी आल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. आता बँकांना ७० टक्के कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करावयाचे आहे. यामुळे कामाला गती देणे गरजेचे झाल्याचे दिसते.(कार्यालय प्रतिनिधी)
पीक कर्ज; ३० टक्के वाटप
By admin | Published: June 11, 2015 2:01 AM