आर्थिक मंदीच्या सावटाने जनता त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:25 AM2019-08-28T00:25:11+5:302019-08-28T00:25:38+5:30
भाजप सरकारची पोलखोल करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात गुरुकुंज मोझरी येथून निघालेली काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पुलगावात आली होती. यावेळी संबोधित करताना माजी खासदार नाना पटोले बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : देशात आर्थिक मंदीचे सावट असून नैसर्गीक आपत्तीमुळे जनता त्रस्त आहे. अशाही परिस्थितीत सर्व सामान्यांच्या भावानांची खिल्ली उडवली जात आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करित भाजपा महाजनादेश यात्रा काढून राज्यभर मतांची भीक मागत आहे, अशी घणाघाती टिका प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी केला.
भाजप सरकारची पोलखोल करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात गुरुकुंज मोझरी येथून निघालेली काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पुलगावात आली होती. यावेळी संबोधित करताना माजी खासदार नाना पटोले बोलत होते. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड.चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, आमदार रणजित कांबळे व शहराध्यक्ष सुनील ब्राह्मणकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजप-सेना युतीच्या सरकारने पाच वर्षात शेतकरी व सामान्य माणसाच्या प्रश्नांना बगल देवून जनतेची फसवणूक केली. सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे. भाषणबाजी करण्यात पटाईत असलेले भाजपाचे नेते भाषणातून आभासी जग निर्माण करतात. नागरिकांना नवनवीन स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली जात आहे. या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण, अद्यापही शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी बँकाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. या शासनाने नोकर भरती बंद केल्याने बेरोजगारीची समस्या वाढली आहे. हल्ली सर्व युवकांना आॅनलाइमध्ये उभे केले आहे. त्यामुळे या देशाची भावी पिढी देशोधडीला लागली आहे. नवीन उद्योगांची निर्मिती होत नसून असलेल्या कंपन्याही बंद होण्याच्या मार्गावर आहे. दररोज कोणती ना कोणती कंपनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबत आहे. तरीही विकास केल्याच्या बाता हे सरकार करित असल्याचे थोरात म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार रणजित कांबळे यांनी तर संचालन रमेश सावकर यांनी केले.
भाजपा नेत्यांवर जादुटोणा केल्याचा आरोप हास्यास्पद
वर्धा: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते पडद्याआड झाले; ही दु:खद बाब आहे. पण, या घटनेचेही भांडवल केले जात आहे. विरोधकांनी जादुटोणा केल्यामुळेच त्यांचे जीव गेल्याचा आरोप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, करीत असून तो हास्यास्पद आहे, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार नाना पटोले यांनी वर्ध्यातील महापर्दाफाश यात्रेदरम्यान केली. पुलगाव येथील जनसभा आटोपून रात्री साडेनऊ वाजतादरम्यान ही यात्रा वर्ध्यात पोहोचली. शिवाजी चौकात या यात्रेचे स्वागत केल्यानंतर ही यात्रा सभास्थळी आली. यावेळी नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. केंद्रात शहा-तानाशहा आहे तर इकडे फसवनीस असल्याने सर्वसामान्यांसह शेतकºयांची वाट लागली आहे. मुख्यमंत्री सध्या दौºयावर असून त्यांना पूरग्रस्तांची काही चिंता नाही. त्यांच्या कार्यालयात महिन्याकाठी ५० कोटीचा खर्च केल्या जातो. सर्वसामान्यांच्या पैशातून जनादेश यात्रा काढली जाते. पुरपरिस्थितीबाबत बोलताना ना. चंद्रकांत पाटील म्हणातात की, आम्हाला इतक्या पावसाचा अंदाजच नव्हता. मग त्यांना २२० जागांचा अंदाज कसा लावता येतो? असा प्रश्न पटोले यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच उज्ज्वला योजनेतून गॅसचे वाटप करुन गरजावंतानाही या सरकारने श्रीमंतांच्या यादीत नेऊन टाकले. त्यामुळे येत्या २०२१ च्या जनगणनेत आपोआप या सर्वांची नावे बीपीएल यादीतून नाहीसे होणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. चारुलता टोकस यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव शेखर शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाला सेवक वाघाये, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष हेमलता मेघे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे, शहराध्यक्ष सुधीर पांगुळ, इंद्रकुमार सराफ, रामभाऊ सातव, राजेंद्र शर्मा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हिवरे यांनी केले.