वर्धा : मागील आठ वर्षांपासून सेलू येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून कुठलीही सोय सुविधा उपलब्ध नसलेल्या किरायाच्या इमारतीतून तहसीलचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे तहसील कार्यालय हक्काच्या इमारतीत स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी किसान अधिकार अभियानकडून तहसीलसमोर भजन आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करणाऱ्या पायऱ्यांवर किसान अधिकार अभियानने भजन आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत इमारत स्थालांतरित होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
२०१३ मध्ये जुने तहसील कार्यालय पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले. या इमारतीचे बांधकाम २०१५ पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, संथ गतीने सुरू असलेले हे काम पाहून अद्याप इमारत पूर्ण होण्यास किती वर्षे लागणार, हा संशोधनाचा विषय बनला आहे. आठ वर्षांहून अधिक काळापासून तहसील कार्यालय हे किरायाच्या इमारतीत पहिल्या माळावर आहे.
या ठिकाणी महिला कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्यांना साधी शौचालयाची व्यवस्था नाही. तसेच बसण्याची व्यवस्था नाही. पिण्याचे पाणी आदी सुविधा नाही. वयोवृद्ध नागरिकांना पायऱ्या चढून जाताना करावे लागणारे कष्ट हे तालुक्यासाठी योग्य नाही. यापूर्वी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नवीन इमारतीत जोपर्यंत हे कार्यालय हलविले जात नाही तोपर्यंत कार्यालयाच्या पायऱ्यांवर भजन आंदोलन करण्याचा निर्धार किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, विठ्ठल झाडे, गजानन गिरडे, राहुल पोकळे, विजय भांडेकर,एकनाथ बरबडीकर, दिलीप भट, मनोहर तेलरांधे आदींनी केला आहे.
आणखी किती दिवस चालणार आंदोलन?
अद्यापही नव्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार असून आंदोलनकर्त्याची मागणी पूर्ण होईपर्यंत दररोज भजन आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. आता प्रशासन हे आंदोलन कसे थांबविणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.