मूक प्रचाराला प्रारंभ : देवळीत एकाही उमेदवाराने प्रचार रॅली काढली नाहीवर्धा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय मिरवणुका काढून पक्षांनी शक्तिप्रदर्शन करून खुल्या प्रचाराचा समारोप केला. रस्त्यावरील प्रचाराचा शेवट झाल्याने आता शेवटच्या दोन दिवसांत होणाऱ्या छुप्या प्रचाराला वेग येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधासभेच्या खुल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जिल्ह्यातील चारही विधानसभाक्षेत्रात प्रमुख राष्ट्रीयपक्षांसह अपक्षांनी मिरवणुका काढत शक्तिप्रदर्शन केले. या मिरवणुका शहरातील नागरिकांनी पाहिल्या. कोणाची मिरवणूक मोठी कोणाची छोटी, कोण निवडून येणार ही चर्चा दिवसभर मिरवणुकीदरम्यान नागरिकांत होती. यातून नागरिकांनी त्यांची गणिते मांडणे सुरू केली आहेत. झालेल्या सभा, भाषणे यातून मतदार त्यांच्या मताची दिशा ठरविण्याबाबत चर्चा करीत असताना दिसून येत होते. खुल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच चारही मतदार संघात मिरवणुका व शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या काळात निघालेल्या या मिरवणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांसह अपक्षांचे पोस्टर बॅनर काढण्याच्या कामाला जोर आला होता. उमेदवाराच्या प्रचाराच्या गाड्या जरी बंद झाल्या तरी त्या गाड्यातून मतदार संघातील ठराविक भागात उमेदवार व त्याच्या कार्यकर्त्यांचे दौरे सुरू झालेत. या दौऱ्यात त्या भागातील उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना भेटून त्या भागातील मतदाराला मतदान केंद्रावर पोहोचविण्याचे काम करण्याची रणनिती आखण्याचे काम सुरू झाले आहे.यात बाहेर गावात असलेले मतदान काढण्याकरिता काय करता येईल, ते आपल्याला कसे मिळेल याकरिता त्या मतदाराचा शोध घेत त्याच्यापर्यंत गाड्या पोहोचविण्याचीही आखणी करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारे आपलाच विजय व्हावा याकरिता उमेदवार व त्याचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रचाराला विराम मिळताच प्रशासनाकडून मतदानाच्या तयारीला वेग आला आहे. (प्रतिनिधी)हिंगणघाट येथे तिघांची मिरवणूक हिंगणघाट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे, भाजपाचे उमेदवार समीर कुणावार, शिवसेना उमेदवार अशोक शिंदे, काँंग्रेसच्या उमेदवार उषाकिरण थुटे, मनसेचे अतुल वांदिले, बसपाचे प्रलय तेलंग यांनी मिरवणूक काढून प्रचाराचा समारोप केला. या उमेदवारांच्या मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने फिरविण्यात आल्या. रॅलीमध्ये त्या त्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.आर्वीत काँग्रेस, शिवसेनेची मिरवणूक तर भाजपची सभाआर्वी मतदार संघात काँग्रेसचे अमर काळे व शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन केले. तर भाजपचे दादाराव केचे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस आणि शिवसेनेची मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने फिरविण्यात आली. यानंतर मिरवणुकीची समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपच्या वतीने प्रचार सभा घेण्यात आली. मागील १३ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा समारोप करण्यात आला.
तीन मतदार संघात उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन
By admin | Published: October 13, 2014 11:24 PM