वर्धा : शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा कायम राहावा, तसेच शेतकऱ्यांना उत्पादित धान्य व्यापाऱ्यांमार्फत बाजारपेठेत न आणता थेट ग्राहकांना शेतातील उत्पादित माल सहज व सुलभपणे योग्य भावात मिळावा, यासाठी एमगिरी परिसरात शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरुपी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही खा. रामदास तडस यांनी दिली. एमगिरी परिसरात कृषी व पणन विभाग तसेच आत्मामार्फत आयोजित धान्य महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी खा. तडस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशुतोष सलील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून एमगिरीेचे संचालक डॉ. प्रफुल्ल काळे, आत्माचे प्रकल्प संचालक दीपक पटेल, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, कृषीतज्ज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, प्रदीप धवने उपस्थित होते.धान्य महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचता येते व ग्राहकांनाही बाजारभावापेक्षा कमी दराने व शेतात उत्पादित केलेला शेतमाल उपलब्ध होतो. शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ व भाव मिळत आहे. एमगिरी परिसरात राज्यातील पहिली शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ बांधण्यासाठी आवश्यक असणारा निधी खासदार निधीतून अथवा जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, तसेच उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव न मिळाल्यामुळे धान्य बाजार ही संकल्पना जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राबविण्याचा मानस आहे. शेतकरी ते ग्राहक असे कायम नाते निर्माण करून ग्राहकांना नियमिंत धान्य पुरवठा करण्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले. एमगिरीचे संचालक प्रफुल्ल काळे यांनी बाराही महिने शेतकऱ्यांना विक्रीची कायम व्यवस्था असावी, यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेतकऱ्यांना या पुढे कुणालाही कमिशन न देता, आपला माल विकता यावा यासाठी बाजारपेठ ही संकल्पना राबविण्याची सूचना यावेळी केली. प्रारंभी आत्म्याचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी धान्य महोत्सव आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. या महोत्सवामध्ये पवनी भंडारा येथील केशर, चिन्नोर आदी तांदूळ तसेच शेतकरी बचत गटाने तयार केलेले तूरडाळ, गहू, चणा, हळद, मिरची तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे विविध फळ व भाजीपाला खाद्यपदार्थ हे या धान्य महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे संचालन विलास दवणे यांनी केले तर आभार पंकज सावरकर यांनी मानले. यावेळी तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, जनार्दन झाडे तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा धान्य महोत्सव २० मार्च पर्यंत आयोजित आहे. येथे विविध ठिकाणाहून शेतकरी सहभागी झाले आहेत.(प्रतिनिधी)शेतकरी गटांचे ४२ स्टॉल ४धान्य महोत्सवात शेतकरी गटाच्या ४२ स्टॉलवरून धान्याची विक्री सुरू आहे. यात भंडाऱ्याच्या केशर, चिन्नोर तांदळाला तर वर्धेच्या तूर डाळीला अधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. या महोत्सवात शेतकरी उत्पादक गटातर्फे फळ व भाजीपालाही उपलब्ध करण्यात आला आहे.
शेतमाल विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ देणार
By admin | Published: March 19, 2016 2:05 AM