लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पती दारू पिऊन मारहाण करतो... पतीचे अनैतिक संबंध आहेत...यामुळे नवरा-बायकोत खटके उडाल्याचे आपण नेहमीच बघतो. मात्र, नवरा काम करीत नाही, दारू पितो, गरजा पूर्ण करीत नाही, या कारणांतूनही पतीला मारहाण आणि मानसिक त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या ‘भरोसा सेल’कडे दाखल होत आहेत. पत्नीकडून छळाच्या कोरोनात तब्बल १०९ तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे.
कोरोनाकाळात कामधंदे बंद असल्याने अनेक जण घरीच आहेत. त्यामुळे आपोआप कुटुंबातील संवाद वाढला. या संवादाचा काहींनी चांगला उपयोग करून घेतला, तर काहींच्या सुखी संसारात वाद उद्भवला. जिल्ह्यात २०१८ मध्ये १११ पुरुषांनी पत्नीविरोधात ‘भरोसा सेल’कडे तक्रार दाखल केली. २०१९ मध्ये १००, २०२० मध्ये ५८, तर २०२१ मध्ये जून महिन्यापर्यंत तब्बल ५१ पुरुषांनी पत्नी छळ करीत असल्याच्या तक्रारी ‘भरोसा सेल’कडे दाखल केल्या आहेत. पत्नी नवऱ्यावर संशय घेऊन स्वत:बरोबर मुलांना सोबत घेत आत्महत्येची धमकी देत आहे. तिच्या आई-वडिलांचे ऐकून घरात सतत भांडणे काढत आहे. माझ्या आई-वडिलांना शिवीगाळ करून वेगळे राहण्याचा आग्रह धरत आहे. मला माझ्या पत्नीकडून धाेका असल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत.
कोरोनाकाळात वाढल्या तक्रारी
कोरोनापूर्वी पती कामानिमित्त बाहेर असल्याने तक्रारी होत नव्हत्या. मात्र, लॉकडाऊनमध्ये सर्वच जण घरी असल्याने अनेकांच्या संसारात खटके उडाले. नातेवाइकांनी अनेक वेळा समजावूनही पत्नी ऐकत नव्हती. त्यामुळे कोरोनाकाळात पत्नीविरुद्ध तक्रारी करण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले. किरकोळ कारणातूही कौटुंबिक कलह वाढत चालला आहे.
मानसिक छळच नाही तर मारहाणही होते...
पुरुषांनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी त्यांचा मानसिक छळ करते. इतकेच नव्हे, तर मारहाणदेखील करीत असल्याच्या तक्रारी ‘भरोसा सेल’कडे दाखल होत आहेत. अनेक प्रकरणांत पत्नी दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्याही तक्रारी आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फॉर्म होम करीत आहेत. कामाच्या वेळा कमी झाल्याने घरातील सहवासही वाढला. यामुळे एकमेकांच्या चुका काढून सतत वाद होत असल्याने पत्नीविरुद्ध तक्रारी दाखल होत आहेत. दररोज किरकोळ वाद वाढत चालला आहे.
भांडणाची ही आहेत कारणं
१) कोरोनात अनेक जण घरीच असल्याने सहवास वाढला. यातून खाद्यपदार्थांची फर्माईशही वाढली.
२) पत्नी मोबाइलवर जास्त वेळ घालवीत असल्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय वाढला अन् वाद झाले.
३) दारू पिण्यास पत्नी पैसे देत नसल्याने पत्नीविरोधात मानसिक छळाच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
पती दारू पिऊन त्रास देतो, मारहाण करतो, दुसऱ्याशी संबंध आहेत. या कारणातून अनेक महिला पतीविरुद्ध तक्रारी घेऊन येतात. मात्र, आता पत्नीपीडितांच्याही तक्रारी वाढू लागल्या असून, ‘भरोसा सेल’मध्ये दाम्पत्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. अनेकांमध्ये समेट घडवून आणण्यातही सेलला यश आले आहे.
मेघाली गावंडे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल