लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी/पुलगाव : देवळी येथील औद्योगिक वसाहतीतील कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात असलेला व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती पुलगाव येथील रहिवासी असल्याने पुलगावातील काही भाग सील करण्यात आला आहे. शिवाय तो परिसर निर्जंतूक केला जात आहे.पुलगाव येथील रहिवासी असलेला व्यक्ती मुंबई (मुलूंड) येथे एल अॅण्ड टी कंपनीत कामाला होता. मुंबईत वाढते कोरोना संकट आणि घराची ओढ यामुळे तो १४ जून रोजी पुलगाव येथे परतला. त्यानंतर त्याला व त्याच्या सोबतच्या तिघांना खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य व महसूल विभागाने देवळीच्या औद्योगिक वसाहतीतील कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणासाठी ठेवले. याच दरम्यान त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यानंतर सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.ब्रह्मपुरीचा एक कोविड पॉझिटिव्ह आल्यावर घेतले नमुनेमुंबई येथून निघालेल्या दुसऱ्या वाहनात वर्धेतील एक तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील दोघे व्यक्ती होते. यापैकी ब्रह्मपुरी येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर देवळीत संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या चौघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.त्याचा अहवाल सोमवारी रात्री उशीरा प्राप्त झाला. या अहवालानुसार पुलगावचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तर उर्वरित तिघे कोरोना निगेटिव्ह आहेत.परिसर केला जातोय निर्जंतुककोविड बाधित आढल्याची माहिती मिळताच आरोग्य व पोलीस प्रशासनाने रात्रभर मोहीम राबवून २३ जणांना क्वारंटाईन केले. या क्वारंटाईन केलेल्यापैकी नऊ व्यक्ती कोविड बाधिताच्या निकट संपर्कात आल्याची नोंद घेत त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर खबरदारीचा उपाय म्हणून पुलगाव शहरातील सुभाषनगर, बरांडा हा परिसर सील करून पुलगाव न.प.च्यावतीने परिसर निर्जंतुक केला जात आहे. हायरिस्कमधील व्यक्तीचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आहे.सात व्यक्ती दोन कारने परतले मुंबईहूनतहसीलदार राजेश सरवदे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण धमाने यांनी सांगितले की, कोरोना बाधित निघालेल्या व्यक्तीसह एकूण सात जण दोन वेगवेगळ्या कारने मुंबई येथून निघाले होते. या दोन वाहनापैकी एका वाहनात पुलगावचा हा इसम आणि इंझाळा येथील तीन व्यक्ती होते. खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तींना देवळीत संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. या कोविड बाधिताच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींना सध्या शोध घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले.
नागरिकांनी घाबरून जावू नये. तसेच अफवावर विश्वास ठेऊ नये. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक व्यक्तीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कोरोनाबाधिताच्या निकट संर्पकात आलेल्यांचा शोध घेतल्या जात आहे.- डॉ. गोपाल नारलवार, वैद्यकीय अधीक्षक, पुलगाव.